अकोला : अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अकोलाच्यावतीने आयोजित शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा -२0१४-१५ चे उद्घाटन आमदार गोवर्धन शर्मा यांच्या हस्ते बुधवार, १८ फेब्रुवारी रोजी वसंत देसाई क्रीडांगण येथे झाले. तीन दिवसीय या स्पर्धेत सात प्रकल्पातील ६५२ मुले व ५३३ मुली खेळाडू सहभागी झाल्या आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उज्ज्वला देशमुख होत्या. प्रमुख अतिथी म्हणून आमदार श्रीकांत देशपांडे, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, आदिवासी विकास अमरावती उपायुक्त एम.जी.राघोर्ते उपस्थित होते. क्रीडा स्पर्धा ध्वजारोहण आमदार शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडाज्योतचे प्रज्वलन महापौर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रा. डवले ग्रुप ऑफ एज्युकेशन अकोलाद्वारा सादर केलेला श्री विठ्ठल माऊली पालखी दिंडी सोहळा अतिशय देखणा झाला. अनुदानित आश्रमशाळा सजनपुरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली. पथसंचलनाच्या अग्रस्थानी अकोला प्रकल्पातील चार सैनिकी शाळांचे मुले सहभागी झाली होती. आमदार शर्मा यांनी आपल्या भाषणात, आदिवासी विद्यार्थ्यांच्या उत्थानासाठी सवरेतोपरी मदत करण्याचे सांगून, या खेळाडूंमधून महाराष्ट्राला निश्चितच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असे मत व्यक्त केले. प्रास्ताविक उपायुक्त एम.जी. राघोर्ते यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जवाहर गाढवे यांनी केले. आभार प्रकल्प अधिकारी नितीन तायडे यांनी मानले. कार्यक्रमाला संतोष काळबांडे, एस.एन. गोतमारे, व्ही.एच. मिरगे, एन.पी. बनसोड आदी उपस्थित होते.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन
By admin | Updated: February 19, 2015 02:09 IST