अकोला : बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यात येणार असल्यामुळे तेथील एका जिल्हापरिषद सदस्यांचे व दोन पंचायत समिती सदस्यांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे याबाबत त्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी या तिन्ही लोकप्रतिनिधींना ११ मे रोजी त्यांच्या कार्यालात हजर राहण्यास एका पत्राद्वारे बजावले आहे. बाश्रीटाकळी ग्रामपंचायतची स्थापना १९५५ मध्ये झाली होती. त्यानुसार तेथील कारभार आजतागायत सुरू आहे. तथापि, राज्य शासनाने राज्यातील तहसील कार्यालय असलेल्या ठिकाणी ग्रामपंचायतींना नगरपरिषद किंवा नगरपंचायतचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्याच्या दृष्टीने नगरविकास मंत्रालयाने १ मार्च २0१४ मध्येच प्राथमिक उद्घोषणा केली होती. त्यासंदर्भात ग्रामविकास व जलसंधारण विभागाने १८ एप्रिल २0१५ रोजी काढलेला आदेश व संबंधित उपसचिवांनी १८ एप्रिल २0१५ रोजी पाठविलेले पत्र, या अन्वये बाश्रीटाकळी ग्रामपंचायतीला नगरपंचायतचा दर्जा देताना बाश्रीटाकळी जिल्हा परिषद मतदारसंघात समाविष्ट सर्व क्षेत्र बाश्रीटाकळी नगरपंचायतीत समाविष्ट होत आहे. तसेच पंचायत समितीचा बाश्रीटाकळी-१ व बाश्रीटाकळी-२ मतदारसंघात समाविष्ट सर्व क्षेत्र प्रस्तावित बाश्रीटाकळी नगरपंचायतीमध्ये समाविष्ट होत आहे. सदर क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ च्या अनुक्रमे कलम २५५ व २५७ अन्वये रद्द करावे लागणार आहे. त्यामुळे तसे करण्यापूर्वी संबंधित सदस्यांची बाजू समजून घेण्याकरिता शासनाने अकोल्याच्या जिल्हाधिकार्यांना प्राधिकृत केले आहे.
बाश्रीटाकळी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्यासाठी सोमवारी सुनावणी
By admin | Updated: May 7, 2015 02:21 IST