अकोला : पटसंख्येअभावी जिल्ह्यातील अनेक शाळांच्या तुकड्या बंद पडत आहेत. याच कारणामुळे शाळेचे मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी अडवणूक करीत असून, मुख्याध्यापकांनी हा प्रकार थांबवावा, अशी मागणी काँग्रेस शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली आहे.शैक्षणिक सत्र २०१३-१४ चा समारोप झाला असून, पुढील शैक्षणिक सत्रातील प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे; मात्र राज्यात प्रत्येक ठिकाणी पटसंख्या अत्यल्प असल्याने तुकड्या बंद करण्याची वेळ शिक्षण संस्थाचालकांवर आली आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापकही विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी टाळाटाळ करीत असून, यामुळे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना त्रास सहन करावा लागत आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची अडवणूक थांबवून त्यांना पाहिजे त्या शाळेत शिकण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेस शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष मनोज पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष प्रकाश तायडे व जिल्हाध्यक्ष प्रकाश डवले यांनी केली आहे. मुख्याध्यापकांनी हा प्रकार न थांबविल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
शाळेच्या दाखल्यांसाठी मुख्याध्यापकांनी अडवणूक करू नये
By admin | Updated: May 13, 2014 20:54 IST