सचिन राऊत / अकोला : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ एप्रिल रोजी मृतदेह आढळलेल्या शंकर जंगलू उर्फ अण्णाच्या अकोला येथील घराच्या झडतीत लाखो रुपयांचे घबाड आणि काही घरांची गहाणखते आढळून आल्यामुळे पोलीस चक्रावले आहेत. एका केबल ऑपरेटरकडे नोकरी करणार्या अण्णाच्या बँक खा त्यांमध्ये लाखो रुपये कोठून आले, हा प्रश्न पोलिसांना पडला आहे. अण्णाचा मृत्यू आकस्मिकरित्या झाला, की त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास पोलीस आता करीत आहेत. बडनेरा पोलिसांच्या प्राथमिक तपासादरम्यान, त्यांच्या हद्दीत आढळून आलेला मृ तदेह अकोल्यातील एका केबल ऑपरेटरकडे रोजंदारीने काम करणार्या अण्णाचा असल्याचे समोर आले. त्यानंतर बडनेरा पोलिसांनी त्याच्या अकोल्यातील बिर्ला कॉलनी परिसरातील घराची झडती घेतली. मृतकाच्या खिशात ३0 ते ३२ लाख रु पयांचे धनादेश होते, अशी विश्वसनीय माहिती आहे. मात्र, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यापूर्वीच त्याच्या खिशातील मोबाइल व धनादेश लंपास करण्यात आले होते. अनोळखी इसमाचा मृतदेह असल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, त्यानंतर हा इसम अकोल्यातील असल्याचे समोर आले. अण्णाच्या घराच्या झडतीदरम्यान, स्टेट बँक व विजया बँकेचे खातेपुस्तक आढळले. त्या पैकी स्टेट बँकेच्या खाते पुस्तकात २ लाख ३५ हजार, तर विजया बँकेच्या खाते पुस्तकात २ लाख २३ हजार रुपये जमा असल्याची नोंद होती. त्याशिवाय अण्णाच्या घरात काही जणांच्या लाखो रुपये किमतीच्या घरांची गहाणखतेही आढळली. गहाणखतांमधील मजकुरानुसार ती घरे अण्णाकडे गहाण ठेवलेली असल्याचे समोर आले. अण्णाने ही संपत्ती पत्त्याच्या जुगारातून जमविल्याचे सांगण्यात येत आहे.
बडने-यात मृतावस्थेत आढळलेल्या अण्णाकडे लाखोंचे घबाड
By admin | Updated: April 18, 2015 01:52 IST