अकोला: गत पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या संथ गतीवर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्री डॉ. पाटील यांनी रविवारी सिव्हिल लाइन रस्त्याच्या कामासह शौचालयाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या शहरातील प्रमुख रस्ते दुरुस्तीसाठी तत्कालीन काँग्रेस सरकारने २0१३ मध्ये मनपाला १५ कोटींचा निधी दिला होता. या निधीत उर्वरित ५0 टक्के रक्कम जमा करण्याची अट नव्हती, हे विशेष. प्राप्त निधीतून मनपाने डांबरी १२ आणि सात सिमेंट रस्ते प्रस्तावित केले होते. डांबरी रस्त्यांची कामे पूर्ण झाली असली तरी सिमेंट रस्त्यांना ग्रहण लागले. यादरम्यान, अजय लहाने यांनी सप्टेंबर महिन्यात मनपाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सिमेंट रस्त्यांच्या ह्यवर्किंग एस्टिमेटह्णमध्ये बदल करून सिमेंट रस्त्यांची रुंदी वाढविण्याचा धाडसी निर्णय घेतला. निविदेला मंजुरी दिल्यानंतर स्थानिक ह्यआरआरसीह्ण कंपनीने मुख्य पोस्ट ऑफीस ते सिव्हिल लाइन चौक रस्त्याच्या कामाला नोव्हेंबर महिन्यात सुरुवात केली. सात सिमेंट रस्त्यांपैकी एकाच रस्त्याच्या निर्माण कार्याला पाच महिन्यांचा अवधी लागत असल्याने अकोलेकरांमध्ये प्रशासनासह सत्ताधार्यांप्रती नाराजीचा सूर आहे. रस्त्याच्या कामाला विलंब लागत असल्याचे पाहून आयुक्त लहाने यांनी संबंधित कंत्राटदाराला नोटीस जारी केल्या. रस्त्यांच्या कामांना दिरंगाई होत असल्याची दखल घेत पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सिव्हिल लाइन रस्ता तसेच दुर्गा चौक ते अग्रसेन चौक रस्त्याची पाहणी केली. रस्त्यांच्या संथ गतीवर पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त करीत कामाची गती वाढवण्याचे निर्देश मनपाला दिले. यावेळी मनपा आयुक्त अजय लहाने, डॉ. किशोर मालोकार, कार्यकारी अभियंता अजय गुजर, कंत्राटदार प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.
सिमेंट रस्त्यांच्या संथ गतीवर पालकमंत्र्यांची नाराजी
By admin | Updated: March 14, 2016 01:21 IST