मूर्तिजापूर : तालुक्यातील गट ग्रामपंचायत मलकापूर येथील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ६ जणांनी ई-क्लास जमिनीवरील मुरुम अवैधरीत्या उत्खनन करून रस्त्यावर टाकल्याचा अहवाल तलाठ्याने दिल्यामुळे तहसीलदारांनी संबंधितांना ५ लाख ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दरम्यान, आपण कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन केले नसल्याचा व मलकापूर येथील रस्त्यावर टाकण्यात आलेल्या २१ ब्रॉस मुरुमच्या रॉयल्टी असल्याचा दावा करतानाच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दंड रद्द करण्याची मागणी सरपंच व उपसरपंचांनी केली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने मलकापूर गावातील रस्त्यांच्या कामाकरिता गट क्र. ५ ई क्लास जमिनीवरील अंदाजे ७० ते ८० ब्रॉस मुरुम उत्खनन करून गावातील रस्त्यांवर टाकल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य मंगेश महादेवराव सरोदे व सदाशिव भिवाजी महानुर यांनी केली होती. या उत्खननासंबंधी व रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मुरुमासंबंधीचा अहवाल तलाठी एस. एम. सुरवाडे यांनी मूर्तिजापूरच्या तहसीलदारांना सादर केला असला तरी अहवालावरून आरोप सिद्ध होत नाहीत. तसे ठोस पुरावे नाहीत़ तेव्हा आमच्यावर आकारण्यात आलेल्या दंडाचा फेरविचार व्हावा, असे सरपंच, उपसरपंच व इतरांनी निवेदनात म्हटले आहे. गावातील रस्ता खराब झाला होता. त्यामुळे रस्त्यावर मुरुम टाकणे गरजेचे झाले होते; परंतु गावातील राजकारणामुळे १/३ बहुमत मिळत नसल्याने ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून संबंधित रस्त्यावर मुरुम टाकला. तथापि, काही सदस्यांनी या कामाबाबत तक्रार केली. तलाठ्यांनीही कोणतीही शहानिशा न करता आमच्याविरुद्ध अहवाल दिला, असेही त्यांनी म्हटले आहे. मुरुम उत्खननासाठी आवश्यक असलेली रॉयल्टी असल्यानंतरही तहसील प्रशासनाने न्याय न करता ५ लाख ५२ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तेव्हा आमच्यावर झालेला अन्याय दूर करावा, असेही संबंधितांनी म्हटले.
लोकवर्गणीतून झालेल्या कामाला शासनाने केला दंड
By admin | Updated: May 16, 2014 00:17 IST