अकोला: गत आठवड्याभरापासून सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात सातत्याने उतार सुरू असून, सोने ३२०००-३२५०० च्या (प्रति दहा ग्रॅम) घरात पोहोचले आहे. गत आठवड्यापूर्वी सोन्याचे भाव ३४ हजार रुपयांच्या पलीकडे जात असताना मध्येच थांबल्याने बाजारपेठेवर परिणाम जाणवत आहे. सोन्याचे भाव उतरत असताना शेअर बाजारात तेजी आल्याने गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळत आहेत. सोबतच सोन्याचे भाव घसरल्याने अनेकांना कोट्यवधींचा आर्थिक फटका सहन करावा लागला.आठवड्याभरापूर्वी सराफा बाजारात सोन्याचे भाव ३४००० रुपये तोळ्े होते. ३४ च्या पलीकडे सोन्याचे भाव जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत असताना अचानक, सोन्याचे भाव गडगडले आणि दोन हजारांची मोठी तूट आली. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करणारे पुन्हा सावध झाले आहे. आठ दिवसांत अचानक सोन्याचे भाव खाली उतरल्याने बाजारपेठेतील अनेकांना कोट्यवधींचा जबर फटका बसला. यामध्ये गुंतवणूकदार आणि व्यापारी दोघांचाही समावेश आहे. सोन्याच्या भाव शक्यतोवर दोन-चारशे रुपयांनी चढ-उतार होत असतो; मात्र यंदा थेट १५०० ते २००० रुपयांनी सोन्याचे भाव घसरल्याने सराफा बाजार हादरले आहे. अवघ्या आठ दिवसांत झालेल्या या बदलामुळे सोन्यात गुंतवणूक करणारा ग्राहकही थबकला आहे. नेहमीप्रमाणे सोन्यात घसरण येताच शेअर बाजारात नव्याने तेजी आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे वळला आहे. मागील महिन्यात झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर देशात तणाव स्थिती निर्माण झाली. त्यामुळे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर विपरीत परिणाम झाला, असे काही जाणकारांचे मत आहे.गुंतवणुकीसाठी योग्य वेळवास्तविक पाहता, सोन्याचे भाव उतरत असताना सोन्यात गुंतवणूक करण्याची वेळ असते; मात्र भारतात सोन्याचे भाव घसरत असताना गुंतवणूक करणारे सावध होऊन गुंतवणूक थांबवितात. सोन्याच्या गुंतवणुकीत ही वेळ योग्य असून, काही महिन्यांतच त्याचा परतावा मिळू शकतो, असेही बाजारपेठेतील तज्ज्ञांचे मत आहे.