गजानन वाघमारे । लोकमत न्यूज नेटवर्कबार्शीटाकळी : रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे ३ लाख ३० हजार रुपये हरभरा प्रशिक्षणाकरिता आले होते. संपूर्ण रब्बी हंगामात कुठेच शेती दिन, शास्त्रज्ञ फेरीवर खर्च न करता बार्शीटाकळी, महान व पिंजर कृ षी मंडळ अधिकाऱ्यांनी संगनमत करून सदर निधीचे धनादेश वटविले व फस्त केले आहेत. आता तालुका कृ षी अधिकारी म्हणतात ‘हरभरा प्रशिक्षणाकरिता आलेला पैसा कृ षी उन्नती, समृद्ध शेतकरी या योजनेवर खर्च करू’, असे अफलातून उत्तरे देऊन भ्रष्टाचारावर पांघरूण टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचा प्रशिक्षणाचा पैसा फस्त करणाऱ्या मंडळ कृ षी अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईची मागणी होत आहे. बार्शीटाकळी तालुका कृ षी विभागासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतून रब्बी हरभरा पिकाकरिता शेतकरी वर्गासाठी शेती दिवस तथा शास्त्रज्ञांच्या भेटी या कार्यक्रमासाठी ३ लाख ३० हजार रुपये निधी शासनाकडून ३१ मार्च २०१७ ला प्राप्त झाला. प्रभारी तालुका कृ षी अधिकारी बार्शीटाकळी यांनी बार्शीटाकळी, महान व पिंजर मंडळाच्या कृ षी अधिकाऱ्यांना सारख्या प्रमाणात म्हणजे प्रतिमंडळ कृ षी अधिकारी १ लाख १० प्रमाणे वाटून घेतला आहे. महान मंडळ कृ षी अधिकारीच प्रभारी तालुका कृ षी अधिकारी आहेत. तालुक्यात मागील २०१६-१७ चा रब्बी हंगामात कुठेच शेती दिन कार्यक्रम झाला नाही, तसेच कुठेच शास्त्रज्ञ फेरीचा विषय नाही. महान कृ षी मंडळ अधिकारी सुरेश इवनाते यांनी ५५ हजार रुपये निधीचा धनादेश क्रमांक ८८२२१० दि. २६.४.१७ व ५५ हजार रुपये निधीचा धनादेश क्रमांक ८८२२९६ दिनांक २६.४.२७ ला उचलला. पिंजर मंडळ अधिकारी पी. एन. मनवर यांनी १ लाख १० हजार रुपयांचा धनादेश , बार्शीटाकळी मंडळ कृ षी अधिकारी एन. बी. बोबडे यांनी १ लाख १० हजार रुपयांचा धनादेश उचलला. सदर धनादेश २५ दिवसांपूर्वी वटविले असून, या तीन मंडळ अधिकाऱ्यांनी ३ लाख ३० हजारांचे धनादेश कार्यक्रम न घेता उचलले. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे ३ लाख ३० हजार रुपयांचा धनादेश वटवून तालुका कृ षी अधिकारी जे महान मंडळ कृ षी अधिकारी आहेत, पिंजर व बार्शीटाकळी कृ षी मंडळ अधिकारी यांनी संगनमत करून गैरप्रकार केल्याचे समोर येत आहे.चौकशी तालुका कृ षी अधिकारी अकोला करणार असून, चौकशी अहवाल आपण आयुक्तांना पाठविणार आहे. नियम- ८ खाली मोठी कारवाई असते, ती आयुक्त स्तरावरून होईल.- राजेंद्र निकम,जिल्हा कृ षी अधीक्षक, अकोला.रब्बी हरभरा पीक प्रशिक्षणाकरिता आलेला निधी ‘कृ षी उन्नती, समृद्ध शेतकरी’ योजनेकरिता खर्च करण्याचे सर्कुलर नाही. आयुक्तांना चौकशी अहवाल पाठविल्यावर कारवाई होईल.- अनिल सोळंके,उपविभागीय कृ षी अधिकारी, रब्बी हरभऱ्याच्या प्रशिक्षणाचा निधी आहे. प्रशिक्षण व्हायचे आहे. मार्चअखेर पैसा आला होता. तो परत जाऊ नये म्हणून उचलला. शासनाने वेळेवर पैसा पाठवावयास पाहिजे होते. आता तो निधी ‘कृ षी उन्नती, समृद्ध शेतकरी’ योजनेत वापरू. मंडळाकडे तिजोऱ्या नाहीत म्हणून सदर पैसा घरी नेला.- सुरेश इवनाते, प्रभारी तालुका कृ षी अधिकारी, बार्शीटाकळी.
प्रशिक्षणासाठीचा निधी परस्पर खर्च!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 02:53 IST