धामणा बु. ता. अकोट,येथील जुना सर्वे नं. २२/२, गट नं. ७४ क्षेत्र ४ हे. ३२ आर ०.२ पोट खराब, आकार ३३.५० पैसे ही शेतजमीन गोकुलचंद गोयनका, सुमित किशोर गोयनका व हर्षित किशोर गोयनका यांच्या आजोबांची आहे. तलाठी राजेेश बोकाडे व मंडळ अधिकारी नेमाडे यांच्यासह किसन ताडे यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे किसन नारायण ताडे याच्या नावावर करून दिली. किसन नारायण ताडे यांनी संगनमताने सदरची शेतजमीन ऊर्मिला किसन ताडे, शिवशंकर किसन ताडे, उमेश रामभाऊ म्हातुरकर, लता उमेश म्हातुरकर यांनी कटकारस्थान करून विभागून घेतली. सदरच्या फेरफारास अमित किशोर गोयनका व इतर यांनी आव्हान देत उपविभागीय अधिकारी अकोट यांचे समक्ष अपिल दाखल केली. अभिलेखावर दस्तऐवजांचे अवलोकन केल्यावरून उपविभागीय अधिकारी, अकोला व अकोट यांनी फेरफार क्र. ७१३ रद्दबातल करून संबंधितांविरुद्ध न्यायिक चौकशीचे आदेश दिले. या संदर्भात अमित गोयनका यांनी कटकारस्थान करणाऱ्या शासकीय कर्मचारी व इतरांविरुद्ध जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षकांकडे तक्रार दाखल केल्यानुसार २३ जानेवारी रोजी दहीहांडा पोलिसांनी संबंधितांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६६, ४६८, ४७१(३४) नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार महेश दिनकर गावंडे, पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत. उपविभागीय अधिकारी अकोट यांच्याकडील अपिलार्थीची बाजू ॲड. एस.जी. चोपडे यांनी मांडली.
तलाठी, मंडल अधिकाऱ्यासह पाचजणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:19 IST