बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरानजीकच्या पेट्रोल पंपानजीक कार व ट्रकची समोरासमोर धडक होऊन वाशिम जिल्ह्यातील चार जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार, ८ जुलै रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. चारही युवक हे शेगावहून दर्शन घेऊन परतत होते.
वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी (कुटे) येथील धनजय नवघरे (२१), विशाल नवघरे (२२), शुभम कुटे (२३) व मंगेश राऊत हे चार युवक कारने (क्र. एमएच ३७ - जी ८२६२) शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेतल्यानंतर घरी परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरानजीक अकोल्याहून जळगावकडे जात असलेला ट्रक (क्र. एमएच १९ - सीवाय ६४०४)सोबत समोरासमोर धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा चुराडा झाला. या अपघातात धनजय नवघरे (२१), विशाल नवघरे (२२), शुभम कुटे (२३) हे घटनास्थळीच ठार झाले, तर मंगेश राऊत याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
------------------------------------
वाहतूक झाली होती विस्कळीत
राष्ट्रीय महामार्गावर अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस पथक व बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवून महामार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणात ट्रकचालकाला अटक करून बाळापूर न्यायालयात दाखल केले असल्याची माहिती आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस उपनिरीक्षक रितेश दीक्षित करीत आहेत.
----------------------------
महामार्गाचे काम संथ; अपघाताच्या घटनांमध्ये वाढ
राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असल्याने अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. महामार्गाचे काम सुरू असल्याने या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्डे वाचविताना होणाऱ्या अपघातांत वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
-------------------------