अकोला: महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या यवतमाळ येथील जलव्यवस्थापन कार्यालयांतर्गत अकोला जिल्ह्यातील चार पाणीपुरवठा योजना मजीप्राच्या अकोला विभागाकडे हस्तांतरित करण्यास शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार या पाणीपुरवठा योजनांचे कामकाज बुधवारपासून मजीप्राच्या अकोला विभागांतर्गत कार्यालयातून सुरू झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, आकोट शहर पाणीपुरवठा योजना, लंघापूर ५७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणि पातूर नगरपालिका पाणीपुरवठा योजना इत्यादी चार पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम मजीप्राच्या यवतमाळ येथील जलव्यवस्थापन कार्यालय अंतर्गत केले जात होते. अकोल्यापासून २00 किलोमीटर अंतरावर असलेल्या मजीप्राच्या कार्यालयाकडून अकोला जिल्ह्यातील या चार पाणीपुरवठा योजनांचा कारभार सुरू होता. ही बाब गैरसोयीची असल्याने, जिल्हय़ातील या पाणीपुरवठा योजनांचा कारभार मजीप्राच्या यवतमाळ येथील कार्यालयाकडून अकोला विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यानुषंगाने जिल्ह्यातील चारही पाणीपुरवठा योजना मजीप्राच्या यवतमाळ येथील कार्यालयाकडून अकोला विभागांतर्गत कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यास शासनाच्या पाणीपुरवठा विभागाकडून मान्यता देण्यात आली. त्यानुसार १ मे पासून चारही पाणीपुरवठा योजना मजीप्राच्या यवतमाळ कार्यालयाकडून अकोला विभागाच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आल्या. या पाणीपुरवठा योजना हस्तांतरित झाल्याने, यासंदर्भात जिल्ह्यातील लोकप्रनिधींनी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
चार पाणीपुरवठा योजना ‘मजीप्रा’च्या अकोला विभागाकडे हस्तांतरित
By admin | Updated: May 7, 2015 02:19 IST