अकोला: उमरीचे माजी सरपंच बंडू गिरी हत्याकांडातील सात साक्षीदारांपैकी पाच साक्षीदार फितूर झाले आहेत. बंडू गिरी हत्याकांडाची सुनावणी सोमवारपासून दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जी. सावदेकर यांच्या न्यायालयात सुरू झाली; परंतु हत्याकांडातील महत्त्वाचे दुवे समजणारे साक्षीदार फितूर झाल्याने या प्रकरणातील हवाच निघून गेली आहे. उमरीतील माजी सरपंच महेंद्र ऊर्फ बंडू गिरी ऊर्फ पुरी गोसावी यांची विदर्भ वाईनबारवर २७ सप्टेंबर २0१३ रोजी बारच्या खरेदी-विक्रीच्या वादातून सुभाष ऊर्फ पिंटू पंुडलिक इंगळे (३५), बाळू ऊर्फ ज्ञानेश्वर पांडुरंग वानखडे व संदीप वानखडे यांनी डोक्यात व पाठीवर पहार घातली आणि त्यांची हत्या केली. ३0 सप्टेंबर रोजी सिव्हिल लाईन पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली होती. तीन आरोपींपैकी संदीप वानखडे याची जामिनावर मुक्तता झाली. सुभाष ऊर्फ पिंटू इंगळे व बाळू वानखडे हे दोन आरोपी अद्यापही कारागृहात आहेत. पोलिसांनी हत्याकांडात वापरलेली पहार जप्त केली होती. यासोबतच आरोपींनी वाशिम येथील एका कापड दुकानातून कपडे व एका फूटवेअर दुकानातून चप्पल खरेदी केली होती. पोलिसांनी या दोन्ही दुकानदारांना साक्षीदार बनविले. तसेच मृतक बंडू गिरीची पत्नी, भाऊ आणि लोणाग्रा, मोठी उमरीतील गायत्री नगरातील दोघांना प्रत्यक्ष साक्षीदार व आणखी एकास साक्षीदार बनविले. सुनावणीदरम्यान सातपैकी पाच साक्षीदार फितूर झाल्याने हत्याकांड प्रकरणाचे महत्त्वच संपले आहे. दोन प्रत्यक्ष साक्षीदारांनीसुद्धा कानाला हात लावल्याने सरकार पक्षाची अडचण वाढली आहे. उर्वरित तीन साक्षीदारांनीसुद्धा सरकार पक्षाने विचारलेल्या प्रश्नांना काहीच उत्तरे दिली नाहीत. मृतक बंडू गिरी यांच्या पत्नीनेसुद्धा आपल्याला पतीचा अपघात झाल्याचा फोन आला होता. त्यांचा खून झाला की नाही झाला, याबाबत आपल्याला माहीत नसल्याचे न्यायालयाला सांगितल्याने प्रकरण आरोपींच्या पथ्थ्यावर पडले आहे.
बंडू गिरी हत्याकांड प्रकरणातील पाच साक्षीदार फितूर!
By admin | Updated: May 13, 2014 20:55 IST