अकोला : गॅस वितरण व्यवस्थेतील गोंधळ आणि वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभे असताना अकोला तालुक्यातील अन्वी मिर्झापूरचे माजी सरपंच असलेले शंकरराव सिरसाट यांचा शनिवारी (दि. २८) दुपारी मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्वी मिर्झापूर येथील माजी सरपंच शंकरराव शिरसाट हे यदुराज गॅस एजन्सीसमोर सिलिंडर मिळविण्यासाठी रांगेत उभे होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला. सरकारकडून गॅसटंचाई नसल्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात वितरण व्यवस्थेत मोठा गोंधळ असल्याचे चित्र आहे. अफवा, वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे ग्राहकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. १४ किलोच्या सिलिंडरऐवजी कमी प्रमाणात गॅस मिळत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून केल्या जात आहेत. या सर्व परिस्थितीत सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांना बसत आहे.
या घटनेवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजनशून्यतेवर टीका केली आहे. गॅस सिलिंडरचा तुटवडा होणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. तरीही शासनाने योग्य नियोजन केले नाही. योग्य वेळी उपाययोजना केल्या असत्या तर शंकरराव सिरसाट यांचा जीव वाचला असता, असे त्यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, गॅस सिलिंडरसाठी लोकांचे जीव जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी तात्काळ उपाययोजना करून पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी शासनाने दक्षता घ्यावी, अशी मागणीही केली.
Web Summary : In Akola, a former village head died while waiting in line for a gas cylinder due to shortages. Public outrage erupted over alleged government mismanagement and inadequate supply, prompting calls for immediate action and compensation.
Web Summary : अकोला में गैस की कमी के कारण सिलेंडर के लिए लाइन में खड़े एक पूर्व सरपंच की मौत हो गई। कथित सरकारी कुप्रबंधन और अपर्याप्त आपूर्ति के कारण जनता में आक्रोश फैल गया, तत्काल कार्रवाई और मुआवजे की मांग की गई।