अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:46 PM2020-08-25T12:46:12+5:302020-08-25T12:46:24+5:30

मनपा प्रशासनाची परवानगी न घेतल्याप्रकरणी नगररचना विभागाने प्रा. तायडे यांना नोटीस जारी केली आहे.

The first experiment of picking up a house by ‘Jack’ in Akola! | अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग!

अकोल्यात ‘जॅक’द्वारे घर उचलण्याचा पहिलाच प्रयोग!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये शास्त्री नगरस्थित एक मजली रहिवासी इमारतीची ‘जॅक’द्वारे उंची वाढविण्यात आल्याचा प्रयोग सोमवारी उघडकीस आला आहे. मालमत्ताधारक प्रा. ययाती तायडे यांनी केलेला प्रयोग पाहण्यासाठी अकोलेकर या ठिकाणी कुतूहलाने जात असले तरी शेजाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. दरम्यान, यासंदर्भात मनपा प्रशासनाची परवानगी न घेतल्याप्रकरणी नगररचना विभागाने प्रा. तायडे यांना नोटीस जारी केली आहे.
प्रभाग क्रमांक १३ मधील शास्त्री नगरस्थित डॉ. साधना लोटे यांच्या हॉस्पिटलसमोर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सहयोगी अधिष्ठाता पदावर कार्यरत प्रा. ययाती तायडे यांचे एक मजली घर आहे. घरासमोरील रस्त्याची आणि मागील बाजूच्या सर्व्हिस लाइनची उंची वाढल्याने दरवर्षी पावसाळ््यात त्यांना सांडपाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत होता. पावसाचे साचलेले पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने प्रा. तायडे मोटरद्वारे पाण्याचा उपसा करतात. पावसाळ््यात दरवर्षी ही समस्या निर्माण होत असली तरी त्यावर मनपा प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याचे चित्र होते. या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशातून शहरातील अभियंता अरविंद कांबळे यांनी इंटरनेटवर शोध घेतला असता त्यांना हरियाणा येथील श्री मार्कंडेश्वर नामक एजन्सी ‘जॅक’च्या माध्यमातून इमारत उचलत (लिफ्ट) असल्याचे आढळून आले. कांबळे यांनी संबंधित एजन्सीसोबत संपर्क साधून सविस्तर माहिती दिली असता एजन्सीच्यावतीने प्रा. ययाती तायडे यांच्या घराची पाहणी करण्यात आली. सदर एजन्सीचा पूर्वानुभव लक्षात घेता प्रा. तायडे यांनी एजन्सीला कंत्राट दिला.


३०० जॅकद्वारे उचलले घर

  •  घराचे मोजमाप घेतले असता १,२०० चौरस फूट नोंद
  • घराची उंची वाढविण्यासाठी ३०० जॅक लावण्यात आले
  •  अडीच ते दीड फूट अंतरावर जॅक बसविले
  •  एका जॅकचे वजन पेलण्याची क्षमता ३० ते ३५ टन आहे
  •  

विदर्भात पहिलाच प्रयोग
‘जॅक’च्या माध्यमातून घराची उंची वाढविण्याचा हा विदर्भातून शहरात पहिलाच प्रयोग मानला जात आहे. घराची उंची रस्त्यापासून तीन फूट वर करण्यात आली असून, आणखी एक ते दीड फूट उंच करण्याची शक्यता आहे. उत्सुकतेपोटी हा प्रयोग पाहण्यासाठी या ठिकाणी नागरिक माहिती घेत असल्याचे दिसून आले.


रस्त्याची व सर्व्हिस लाइनची उंची वाढल्याने घरात पावसाळ््यात घाण सांडपाणी साचत होते. या समस्येविषयी मनपाकडे दाद मागितली. अखेर जॅकद्वारे घराची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात मनपाकडे ७ आॅगस्ट रोजी पत्र देऊन अवगत केले आहे. त्यानंतरच कामाला सुरुवात केली. देशात हा प्रयोग नवीन नाही.
-प्रा. ययाती तायडे, मालमत्ताधारक

 

Web Title: The first experiment of picking up a house by ‘Jack’ in Akola!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.