अकोला: कोळसा घेऊन गुजरातकडे निघालेल्या मालगाडीला आग लागल्याची घटना, शनिवारी सकाळी अकोला रेल्वे स्थानकानजीक घडली. कोळशाच्या वाघिणीतून धूर निघत असल्याचे वेळीच लक्षात आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे मुंबईकडे जाणार्या गीताजंली एक्स्प्रेसला ४५ मिनिटे उशीर झाला. चंद्रपूर जिल्हय़ातील ताडाळी येथून कोळसा घेऊन गुजरातमधील सुरतनजीक असलेल्या उकईकडे निघालेल्या मालगाडीतील शेवटून चौथ्या क्रमांकाच्या वाघिणीतील कोळशाने पेट घेतला. ही बाब अकोला रेल्वे स्थानकाजवळून ५ किलोमीटर लांब असलेल्या येऊलखेड स्थानकाजवळ गार्ड अविनाश बगळे यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ अकोला रेल्वे स्थानकास याबाबत सूचित केले. सकाळी ११ वाजताच्या सुमारास मालगाडी अकोला रेल्वे स्थानकावर पोहोचताच, अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविण्यात आली. आग लागण्याच्या या प्रकारामुळे सकाळी ११.१५ वाजता अकोला रेल्वे स्थानकावर पोहचणार्या गीतांजली एक्स्प्रेसला ४५ मिनिटे विलंब झाला.
अकोला रेल्वे स्थानकावर मालगाडीला आग
By admin | Updated: June 15, 2014 22:22 IST