लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : दर्यापूर रस्त्यावरील उड्डाण पुलावर उभ्या ट्रॅक्टरमध्ये २५ मे रोजी सकाळी ११.३० वाजता अचानक आगीचा भडका उडाला. क्षणातच पूर्ण ट्रॅक्टरला आगीने घेरले. आगीमुळे टायर फुटल्याने उड्डाण पुलालगत असलेल्या झोपडपट्टी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली.आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे हे उड्डाण पुलालगत असलेल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात विविध समस्या सोडविण्यासाठी आलेल्या नागरिकांचे समाधान करीत होते. यावेळी त्यांचे लक्ष उड्डाण पुलावर ट्रॅक्टरला लागलेल्या आगीच्या लोळाकडे गेले. त्यामुळे त्यांनी त्वरित नगर परिषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधून अग्नीशामक गाडी पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर नगर परिषदेची अग्निशामक गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली. त्यामुळे ट्रॅक्टरला लागलेली आग त्वरित आटोक्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तेथे खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्याचे निर्देश दिले. यावेळी आग विझविण्याचे व वाहतूक सुरळीत करण्याचे कार्य करणारे कमलाकर गावंडे, राहुल गुल्हाने, न. प. सदस्य बांधव व कर्मचारी, पोलीस प्रशासन यांचे आमदार हरीश मारोतीआप्पा पिंपळे यांनी आभार मानले.
उड्डाण पुलावर ट्रॅक्टरला लागली आग
By admin | Updated: May 26, 2017 02:49 IST