मूर्तिजापूर(अकोला) : गायरान जमीनीवर केलेल्या अतिक्रमीत जमीनीवरून मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम सांगवी (दुर्गवाडा) येथील दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ४ जानेवारी रोजी घडली. या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. दुर्योधन आनंद खांडेकर (५०) असे मृतकाचे नाव आहे. सांगवी (दुर्गवाडा) येथे अतिक्रमण जमिनीचा वाद गत दोन वर्षांपासून धुमसत होता. या वादाचे पर्यवसान दोन गटात मारहाणीत झाले. लाठी- काठी, लोखंडी पाईप व कुºहाडीने दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर हल्ला चढविला. यात दुर्योधन आनंद खांडेकर हा घटनास्थळीच ठार झाला तर चंदा खांडेकर, आदेश खांडेकर, विजयमाला खांडेकर, माधुरी खांडेकर, शुभानंद खांडेकर यांच्यासह सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना अकोला येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची ठिणगी ४ जानेवारी रोजी दुपारी अतिक्रमण असलेल्या शेतात उडाली. तेथे खांडेकर आणि चव्हाण यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तेथून सर्व घरी परत आल्यावर संध्याकाळी ६:३० च्या सुमारास संगनमत करुन आरोपींनी खांडेकर यांच्या घरी येऊन त्यांच्या परिवारावर लाठ्या काठ्या व धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात गंभीर जखमी होउन रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दुर्योधन खांडेकर हे जागीच गतप्राण झाले. यासंदर्भात शुभानंद खांडेकर याचे फियार्दी वरुन ग्रामीण पोलीसांनी आरोपी गजानन गोपाळ चव्हाण, श्रीकृष्ण गोपाळ चव्हाण, कमलाकर गोपाळ चव्हाण, जिवन गजानन चव्हाण, गोपाल श्रीकृष्ण चव्हाण, श्रीकृष्ण गोपाळ चव्हाण, करण चव्हाण, राज चव्हाण या ७ आरोपींना अटक केली. त्यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, ३०७, ५५२, ३२४, १३४, १४७, १४८, १४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार रहीम शेख, उपनिरीक्षक रत्नपारखी, हेड कॉन्स्टेबल गोपाल भवाने करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)
अतिक्रमित जमीनीच्या वादातून एकाची हत्या; सहा जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 18:02 IST
अतिक्रमण केलेल्या जमिनीवरुन दोन्ही गटात नेहमी खटके उडत असत. याचेच पर्यवसन शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताचे दरम्यान तुंबळ मारहाणीत झाले
अतिक्रमित जमीनीच्या वादातून एकाची हत्या; सहा जण गंभीर जखमी
ठळक मुद्देदुर्योधन आनंद खांडेकर (५०) असे या घटनेत ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.यामध्ये अन्य सहा जण गंभीर जखमी झाले.या प्रकरणी सहा आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.