महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 03:17 PM2019-11-15T15:17:05+5:302019-11-15T15:17:52+5:30

महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या प्रभागातील मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब घेतल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.

'Fielding' for mayor's office; Voting will be reviewed! | महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी!

महापौर पदासाठी ‘फिल्डिंग’; मतदानाची होणार उजळणी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: महापालिकेच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर होताच खुल्या व ओबीसी प्रवर्गातील इच्छुक महिला उमेदवारांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी यंदाचे महापौरपद सहज पदरात पडेल, याबद्दल खुद्द भाजपाच्याच गोटातून साशंकता व्यक्त केली जात आहे. अकोला पूर्व तसेच अकोला पश्चिम मतदारसंघाचा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर मतांचे समीकरण नेमके बिघडले कोठे, या विचाराने पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह पदाधिकाऱ्यांच्या डोक्याचा भुगा होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून त्यांच्या प्रभागातील मतदानाच्या टक्केवारीचा हिशेब घेतल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे.
२०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेनंतर एप्रिल २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतही भाजपाने घवघवीत यश मिळवित केंद्रात एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातही भाजपाने ‘शतप्रतिशत’चा नारा दिला. जिल्ह्यात गत २५ वर्षांपासून काँग्रेसची झालेली पीछेहाट अद्यापही कायम आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील पाचपैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपाने विजयश्री प्राप्त केल्यामुळे यंदाही निवडणुकीत विजय पक्काच, असा उमेदवारांचा दावा होता. सुज्ञ मतदारराजाने उमेदवारांचे सर्व अंदाज चुकवत विजयाची माळ गळ्यात घालण्यासाठी अक्षरश: अंतिम फेरीपर्यंत झुलवत ठेवल्याचे चित्र समोर आले. अकोला पूर्व तसेच अकोला पश्चिम मतदारसंघातील उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील, असा कयास लावल्या जात होता. निकालानंतर उमेदवारांचा अपेक्षाभंग झाल्याचे दिसून आले. त्यामुळे मतांचे समीकरण बिघडले कसे आणि त्याला जबाबदार कोण, याचा शोध घेताना पक्षाचा कस लागत असल्याचे बोलल्या जात आहे. अशा स्थितीत महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाले आणि पुन्हा एकदा भाजपात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे.


..तर महापौर पदाचा दावा कसा करणार?
निवडणूक कोणतीही असो, जाती-पातीच्या समीकरणांना केंद्रस्थानी ठेवूनच सर्व राजकीय खेळ्या केल्या जातात. नगसेविकांच्या प्रभागात विधानसभा निवडणुकीत नेमके मतदान झाले किती, याची आकडेवारी तपासल्यानंतर महापौर पदाचा दावा कसा करता येईल, याकडेही इतर इच्छुक नगरसेविकांचे लक्ष लागले आहे.


प्रभागनिहाय मतदानाची माहिती जमा
विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातून अपेक्षित यश मिळू शकले नसल्याची उमेदवारांना खंत आहे. पक्षांतर्गत विरोधक, नाराज बुथ प्रमुख व सुस्तावलेल्या नगरसेवकांनी मतदानाच्या दिवशी कोणते दिवे लावले, याबद्दल माहिती घेण्याच्या उद्देशातून प्रभागनिहाय तसेच मतदान केंद्रावरील खोलीनिहाय मतदानाची माहिती जमा करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती आहे.

Web Title: 'Fielding' for mayor's office; Voting will be reviewed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.