अकोला - अकोला आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणार्या पाच जिल्ह्यातील वर्ग ३ च्या ४०० आरोग्य कर्मचार्यांच्या एकाचवेळी बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्या नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बदल्यांविरोधात आरोग्य सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी जाधव यांनी बुधवारी आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कर्मचार्यांकडून बदलीसाठी रीतसर अर्ज मागविण्यात आले होते. मात्र बदली करताना नियम धाब्यावर बसवून बदल्या करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. नियमानुसार बदलीपात्र असलेल्या कर्मचार्यांपैकी ३० टक्के कर्मचार्यांच्या बदल्या करता येतात. मात्र आरोग्य विभागाने सर्वच नियम पायदळी तुडविले आहेत. विनंतीवरून काही कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, इतर सुमारे २५० कर्मचार्यांच्या बदल्या या नियमबाह्य असल्याचा आरोप केला आहे. या बदल्या रद्द करण्यात याव्या, यासाठी रवी जाधव यांनी आरोग्य कर्मचार्यांसह आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
नियमबाह्य बदल्यांविरोधात उपोषण
By admin | Updated: June 4, 2014 22:04 IST