अकोला : भारतीय क्रिकेट संघाचा अव्वल फलंदाज विराट कोहलीचा चाहता वर्ग मोठा असून, त्याची एक झलक पाहण्यासाठी किंवा त्याच्याशी संवाद साधण्यासाठी क्रिकेट प्रेमी आसुसलेले असतात. क्रिकेट सामन्यात विराट क्षेत्ररक्षण करण्यासाठी सीमारेषेवर असला की वेळ मिळाल्यानंतर तोही प्रेक्षकांना प्रतिसाद देतो. नागपूर येथील सामन्यादरम्यान एका अकोलेकर प्रेक्षकाने विराटला चक्क अकोल्यात येण्याचे निमंत्रण दिल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
नागपूर येथील जामठ्याच्या मैदानावर शुक्रवारी भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान रंगलेला सामना पाहण्यासाठी अकोल्यातील क्रिकेट चाहते मोठ्या संख्येने गेले होते. मैदान ओले असल्यामुळे सामना तब्बल अडीच तास उशिरा सुरू झाला. ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी सुरू असताना विराट कोहली लाँग ऑनवर क्षेत्ररक्षण करत होता. यावेळी काही अकोलेकर प्रेक्षक सीमारेषेजवळच्या आसनांवर होते. विराट सीमारेषेजवळ आल्यानंतर एका अकोलेकर प्रेक्षकाने, ''ओ विराटभाई अकोला चल रहे क्या अकोला'', अशी जोराने हाक दिली. विराटचे लक्ष नसल्याचे पाहून तो पुन्हा जोराने म्हणतो, ''ओ विराट, अकोला चलते क्या नवरात्र खेलने... गरबा-गरबा..... बनाऊ क्या टिकट अकोला की!''
प्रचंड गोंगाट असल्याने विराटचे तिकडे लक्ष जात नाही. हा छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.