Extension of the beneficiary application till 20th July! | लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ!
लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदतवाढ!

अकोला : जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांतर्गत लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यास २० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला.
जिल्हा परिषद सेसफंडातून महिला व बालकल्याण विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांसाठी लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्याची मुदत २८ जूनपर्यंत निश्चित करण्यात आली होती; परंतु जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर या मुदतीत लाभार्थींकडून आवश्यक त्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले नाही. त्यामुळे महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांतर्गत लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा ठराव समितीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समिती सदस्य ज्योत्स्ना बहाळे, मंजूषा वडतकार, माया कावरे, वेणू चव्हाण, मंगला तितूर, माधुरी कपले, महिला व बालकल्याण अधिकारी विलास मरसाळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

प्रशिक्षणाच्या योजनांसाठी १.२० कोटींची तरतूद!
जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये मुलींना संगणक प्रशिक्षण देणे, मोबाइल व संगणक प्रशिक्षण, शिवणकाम व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, बेकिंग व केटरिंग प्रशिक्षण व इतर प्रशिक्षणाच्या योजना राबविण्यासाठी १ कोटी २० लाख रुपयांची तरतूद करण्याचेही या सभेत ठरविण्यात आले.

 


Web Title: Extension of the beneficiary application till 20th July!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.