वल्लभनगर : विजेच्या कडकडाटामध्ये इलेक्ट्रानिक उपकरणे चालू ठेवल्यामुळे घरातच टीव्हीचा स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार निंभोरा येथे १२ तारखेच्या रात्री दहा वाजता घडला. या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण पसरले असून, भूमिहीन कुटुंब रस्त्यावर आले आहे. निंभोरा येथे तेजराव बघे यांचे कुटुंब राहते. मोलमजुरी करू न आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणार्या तेजराव बघे यांनी घरात धान्य साठवून ठेवले होते; परंतु अचानक घडलेल्या या प्रकाराने घरातील टीव्हीचा जोरदार स्फोट झाला. यावेळी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे घराने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा मोठ्या असल्यामुळे वेळीच आग आटोक्यात आणण्यात अडथळा होत होता. या आगीमध्ये बघे यांच्या घरातील गहू पाच पोते, तूर, हरभरा, दाळ, कपडे व मजुरीची जमा केलेली २५ हजार रोख रक्कम जळून खाक झाली. गावकर्यांनी प्रयत्न केल्यामुळे आग आटोक्यात आली. गावातील रमेश श्रीनाथ यांनी वीज प्रवाह खंडित केला. गावातील बाळकृष्ण बिल्लेवार, भास्कर बिल्लेवार, तुळशिराम सुलताने, शामराव इंदोरे, साहेबराव पाखरे यांच्यासह गावकर्यांनी आग विझविण्यास मदत केली. तेजराव बघे यांच्या घरातील एकही वस्तू शिल्लक राहिली नसल्यामुळे या कुटुंबावरआता रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. समाजातील दानशूर लोकांनी या परिवारास मदत करावी, अशी मागणी होत आहे.
टीव्हीच्या स्फोटात घराची राखरांगोळी
By admin | Updated: June 13, 2014 19:04 IST