मागील काही दिवसांत शहरात संसर्गजन्य काेराेनाचा प्रसार वेगात झाल्याचे समाेर आले आहे. जिल्ह्यातही हिच परिस्थिती असून, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पाॅझिटिव्ह रुग्णांमुळे वैद्यकीय आराेग्य यंत्रणेवर ताण येत आहे. २३ मार्च, २०२० मध्ये टाळेबंदी लागू केल्यानंतर, शहरात ७ एप्रिल राेजी काेराेनाचा पहिला रुग्ण आढळून आला हाेता. त्यानंतर, जुलै महिन्यापर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत माेठी वाढ झाली हाेती. दिवाळीपर्यंत या संख्येत कमालीची घसरण झाल्याने अकाेलेकरांना दिलासा मिळाला हाेता. दिवाळीनंतर काेराेनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाली हाेती. मागील काही दिवसांपासून अचानक ही संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासन व महापालिकेची झाेप उडाली आहे.
पूर्व, दक्षिण झाेनमध्ये संख्या वाढली!
एप्रिल, २०२० मध्ये शहरातील उत्तर झाेन काेराेनाचा हाॅटस्पाॅट ठरला हाेता. आता पूर्व झाेनमधील जठारपेठ चाैक परिसर, कृषिनगर, रविनगर, गाेरक्षण राेड, तसेच दक्षिण झाेनमधील खडकी, काैलखेड, रिंगराेड, खेतान नगर, लहरियानगर, हिंगणा राेड परिसरात पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे.
२५४ स्वॅब नमुने जमा
मनपाच्या किसनीबाई भरतीया रुग्णालयात १८० जणांचे स्वॅब घेण्यात आले, तसेच फिरत्या मोबाइल व्हॅनद्वारे कृषिनगर येथून २० व कौलखेड चौकातून ५४ नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. या तीनही ठिकाणी डाॅ.प्रभाकर मुद्गल, डाॅ.विजय चव्हाण व डाॅ.मनीषा लहाने यांच्या मार्गदर्शनात स्वॅब घेण्यात आले. संबंधितांचे नमुने पुढील चाचणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.