धूळ अन् थंडीमुळे दमा रुग्णांचा वाढला त्रास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 01:49 PM2020-01-11T13:49:18+5:302020-01-11T13:49:23+5:30

दमाच्या रुग्णांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.

Dust and cold increase asthma patients suffer! | धूळ अन् थंडीमुळे दमा रुग्णांचा वाढला त्रास!

धूळ अन् थंडीमुळे दमा रुग्णांचा वाढला त्रास!

Next

अकोला : कधी थंडी, तर कधी ढगाळ वातावरणामुळे हवामानात झपाट्याने बदल होत आहे. अशा वातावरणाचा आरोग्याला फटका बसत असून, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मुख्य रस्त्यांच्या निर्माण कार्यामुळे शहरात सर्वत्र धूळ पसरली असून, दमा रुग्णांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे दमाच्या रुग्णांनी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देत आहेत.
राज्यातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून काही दिवसांपूर्वीच अकोला अव्वलस्थानी पोहोचले. वाहनांच्या धुरासोबतच रस्त्यावरील धुळीच्या कणांमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. या प्रदूषणाचा अकोलेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, सर्वाधिक धोका दमा आजारांच्या रुग्णांना होत आहे. हवेतील धुळीच्या कणांमुळे दमा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असून, त्यांच्यासाठी हा प्रकार जीवघेणा ठरत आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावा लागत आहे. अशा परिस्थितीत अकोलेकरांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

हे करा...

  • बाहेर निघताना मास्कचा वापर करावा.
  • धुळीच्या मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
  • उघड्यावरील तळलेले खाद्यपदार्थांचे सेवन टाळा.
  • श्वास घेण्यास त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.


‘जीएमसी’त औषधे मर्यादितच!
सर्वोपचार रुग्णालयात इतर औषधांसोबतच दमा रुग्णांसाठी आवश्यक औषधच उपलब्ध नव्हते. महिनाभरापूर्वी हाफकिनमार्फत औषधांचा पुरवठा करण्यात आला; परंतु हा औषधांचा साठा काही दिवस पुरेल, असा आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता हा औषध साठा जास्त दिवस पुरणार नसल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.



थंडीमुळे दम्याच्या रुग्णांना त्रास होतो; पण रस्त्यावरील वाढलेल्या धुळीमुळे हा त्रास जास्त वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: Dust and cold increase asthma patients suffer!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.