पिंजर (अकोला) : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला येथील भरारी पथकाने बाश्रीटाकळी तालुक्यातील राजंदा, वरखेड, वाघजाळी आणि मोर्णा नदीकाठी सुरू असलेल्या अवैध गावठी दारू गाळण्याच्या अड्डय़ांवर छापा टाकून ३१ हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या या कारवाईमुळे बाश्रीटाकळी तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, बाश्रीटाकळी तालुक्यातील काही गावांमध्ये तसेच मोर्णा नदीकाठी गावठी दारू गाळण्याचे अड्डे बिनबोभाट सुरू असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला येथील पथकास मिळाली होती. भरारी पथकाने गुरुवारी राजंदा, वरखेड, वाघजाळी व मोर्णा नदीकाठावरील दारू अड्डय़ांवर छापे घातले. पथकाच्या कारवाईची चाहूल लागताच या ठिकाणाहून दारू गाळणारे पळून जाण्यात यशस्वी ठरले. तथापि, या पथकाने १५ लिटर क्षमतेचे ९0 पिंप, १३७५ लिटर मोह सडवा, २५ लिटर गावठी दारू व दारु गाळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकून ३१ हजार ८५0 रुपयांचा मुद्देमाल येथून जप्त केला. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक आर. के. फुसे, दुय्यम निरीक्षक आर. डी. पाटणे, पी. टी. धांडे, सहायक निरीक्षक व्ही. आर. बरडे, संतोष सोनोने, विशाल बांबलकर, सोमेश्वर जाधव, कोमल शिंदे आणि बबिता गवळी या अधिकार्यांनी केली.
गावठी दारू अड्डय़ांवर छापा; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
By admin | Updated: November 29, 2014 01:11 IST