अकोला, दि. २७- अकोला माहेर असलेल्या आणि औरंगाबाद सासर असलेल्या एका डॉक्टर पत्नीचा डॉक्टर पतीकडून माहेरवरून ६५ लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार सोमवारी रात्री समोर आला. या प्रकरणी डॉ. पूनम चव्हाण यांनी औरंगाबाद येथील सासरच्या सात जणांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अकोल्यातील राऊतवाडीमध्ये राहणार्या पूनम (२१) हिचा विवाह औरंगाबाद येथील डॉ. सुदाम रमेश चव्हाण याच्यासोबत काही दिवसांपूर्वी झाला होता. विवाहानंतर काही दिवसातच सासरच्या मंडळीने पूनमला माहेरवरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. एक-दोन वेळा पैसे दिल्यानंतर तिच्या सासरच्यांनी हॉस्पिटल बांधण्यासाठी थेट ६५ लाख रुपये माहेरवरून आणण्यासाठी त्रास देणे सुरू केले; मात्र पूनमने पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर तिच्या सासरच्या मंडळीने पूनमचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. छोट्या-छोट्या कारणावरून पूनमला त्रास देण्यात येत होता. हा त्रास असहय़ झाल्यानंतर पूनमने माहेर गाठून पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध सोमवारी रात्री सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी पूनमचा पती डॉ. सुदाम रमेश चव्हाण, सासरा रमेश केशव चव्हाण, सासू देवकाबाई रमेश चव्हाण, करण चव्हाण, दिनेश चव्हाण, मगत चव्हाण, पुला पवार (नणंद), सुनील चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल केला.
माहेरवरून ६५ लाख आणण्यासाठी डॉक्टर पत्नीचा छळ
By admin | Updated: March 28, 2017 01:45 IST