----------------------------------------
मूर्तिजापूर : शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये विकासकामे ठप्प असून, अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत न.प.ला वारंवार निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे नगरसेवक तसलीमखाँ बिसमिल्लाखाँ यांनी नगर परिषद प्रशासनाविरुद्ध बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
मूर्तिजापूर नगर परिषदेचे शिवसेनेचे नगरसेवक तसलीमखाँ बिसमिल्लाखाँ यांनी दिलेल्या निवेदनानुसार, शहरातील प्रभाग क्र. ४ मध्ये मागील पाच वर्षांत नगर प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून विकासकामे केली नाहीत. त्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तसेच प्रभाग क्र. ४ मध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत. याविषयी अनेकदा निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. याबाबत कारवाई न झाल्यास २५ जानेवारी रोजी सकाळी ११ ते ४ वाजतापर्यंत नगर परिषद गेटसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करणार असल्याची माहिती नगरसेवक तसलीमखाँ बिसमिल्लाखाँ यांनी दिली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्याधिकारी नगर परिषद व जिल्हाधिकारी अकोला यांनाही दिल्या आहेत.