मूर्तिजापूर : शहरवासीयांचा जीव पाण्यासाठी कासाविस झाला असून, नगर पालिकेने आपल्या अखत्यारितील पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कृष्णराव गावंडे यांनी केली आहे.मूर्तिजापुरातील नागरिकांना गत अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नळांना दर पंधरा दिवसांनंतर पाणी येते. हे पाणी पिण्यास योग्य असेलच याची खात्री देता येत नाही. गत चार-पाच वर्षांपूर्वर्ी मूर्तिजापूरचा पाणीपुरवठा हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होता. त्यानंतर पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी नगर पालिकेने स्वत:कडे घेतली. तालुक्यात आधीच पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यात नगर पालिकेकडे कुशल कर्मचार्यांची वानवा आहे. त्यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचे संकट अधिकच गडद झाले. मूर्तिजापूरच्या पाणी समस्येविषयी समाजसेवक कृष्णराव गावंडे यांनी जिल्हाधिकारी अकोला यांच्याशी चर्चा केली असता, पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कुशल कर्मचार्यांची गरज आहे आणि कुशल कर्मचारी मजीप्राकडे आहेत. मूर्तिजापूर नगर पालिकेने पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव पाठविलेला नसल्यामुळे पाणीपुरवठ्याची जबाबदारी मजीप्राकडे देण्यात आली नाही, असे ते म्हणाले.
पाणीपुरवठा योजना मजीप्राकडे सोपविण्याची मागणी
By admin | Updated: June 3, 2014 20:53 IST