बार्शीटाकळी : मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांना बार्शीटाकळी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तुणकुलवार यांनी फोनवरून असभ्य भाषेत शिवीगाळ केल्याचा प्रकार समोर आला असून, याची पुष्टी स्वतः आमदार पिंपळे यांनी माध्यमांपुढे केली आहे. या प्रकारानंतर आमदार पिंपळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठाणेदार तुणकुलवार यांच्यासह संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. तसेच, शिवीगाळीचा ऑडिओ क्लिपदेखील गृहमंत्र्यांना सादर केला आहे.
कत्तलीसाठी गुरे नेणाऱ्या ट्रकवरून वाद
घटनेचा उगम भाजप कार्यकर्ते हरीष वाघ यांनी कत्तलीसाठी गुरे नेणाऱ्या ट्रकबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर झाला. सदर ट्रक बार्शीटाकळी टी-पॉइंटवर अडवण्यात आला, मात्र त्यानंतर पैसे घेऊन वाहन सोडल्याचा आरोप आमदार पिंपळे यांनी केला आहे. यानंतर वाघ याने ही बाब आमदारांकडे उघड केल्यामुळे ठाणेदार तुणकुलवार यांनी आमदारांना फोन करून शिवीगाळ केली, असा गंभीर आरोप पिंपळे यांनी केला आहे.
ठाणेदार वैद्यकीय रजेवर
ठाणेदार प्रकाश तुणकुलवार सध्या वैद्यकीय रजेवर असल्याची माहिती आहे. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहता, आमदार पिंपळे यांनी तत्काळ कठोर कारवाईची मागणी केली. राजकीय पदाची प्रतिष्ठा अबाधित राहावी, यासाठी अशा अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, असे पिंपळे यांनी सांगितले.
व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे खळबळ
या प्रकरणातील व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एका व्यक्तीने आमदाराला असभ्य भाषेत धमकी दिल्याचे स्पष्ट ऐकू येते. यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, गृहमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.