अकोला: तोष्णीवाल ले-आउटमधील रहिवासी तथा अँड. प्रवीण कडाळे यांचे बंधू अरविंद कडाळे यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्यानंतर ते बाळापूरनजीक भिखुंड नदीत कोसळले व नदीच्या पुरात वाहून गेले होते. या अपघातात जखमी झाल्यानंतर तिसर्या दिवशी त्यांचा मृतदेह नदीच्या काठावर आढळला. अरविंद कडाळे यांचे शेगाव शेतशिवारात शेत असल्याने ते पीक विमा काढण्यासाठी शेगाव येथे जात होते. बाळापूरनजीक गेल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या धडकेत त्यांची दुचाकी बाजूला फेकल्या गेली तर ते नदीच्या पाण्यात फेकल्या गेले. भिखुंड नदीला पूर असल्याने ते जखमी अवस्थेतच पुरात वाहून गेले. रात्री उशिरापर्यंंत अरविंद कडाळे घरी न परतल्याने त्यांचे बंधू अँड. प्रवीण कडाळे व त्यांचा मित्र परिवार अरविंदला शोधण्यासाठी गेले असता त्यांना नदीच्या काठावर दुचाकी बेवारस असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली; मात्र पुरामुळे पोलिसांनाही कडाळे यांना शोधणे कठीण झाले. दुसर्या दिवशी पोलिसांनी पूर उतरल्यानंतर अरविंद कडाळे यांचा शोध घेतला असता त्यांच्या शरीरावर प्रचंड जखमा असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. अरविंद कडाळे हे जिल्हा परिषदेमध्ये महिला आर्थिक विकास मंडळात मनुष्यबळ संघटक म्हणून कार्यरत होते; मात्र व्यापार सांभाळण्यासाठी त्यांनी नोकरी सोडून कारभार मोठा जोमात सुरू केला होता. अचानकच त्यांचा शुक्रवारी रात्री अपघातात मृत्यू झाला.
अपघातातील जखमीचा अखेर मृत्यू
By admin | Updated: August 1, 2016 01:06 IST