बोरगाव मंजू : आपातापा येथील कर्मयोगी बाबासाहेब आपोतीकर विद्यालयातील नवव्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपी शिक्षकाला अकोला न्यायालयाने गुरुवारी एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली. आपोतीकर विद्यालयातील शिक्षक संजय सखाराम गोपनारायण यांनी १३ डिसेंबर २0१४ रोजी विनयभंग केल्याची तक्रार दाखल करण्यात आल्यावरून बोरगाव मंजू पोलिसांनी संजय गोपनारायणविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, लोकांनी मारहाण केल्यामुळे गोपनारायण यांना अकोल्याच्या सवरेपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून अकोला न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अकोला न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने त्यांना अकोला पोलिसांना शरण जाण्यास सांगितले होते. त्यानुसार गोपनारायण ९ एप्रिल रोजी शरण आले होते. अकोला पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले असता पोलिसांच्या विनंतीनुसार त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी ठाणेदार डी.के.आव्हाळे व पो.हे.काँ. अरुण गावंडे पुढील तपास करीत आहेत.
विनयभंगप्रकरणी शिक्षकाला एक दिवसाची पोलीस कोठडी
By admin | Updated: April 10, 2015 01:41 IST