दानापूर : तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे गत आठवडाभरापासून डेंग्यूसदृश आजाराने थैमान घातले असून, गावातील अनेक जण तापाने फणफणलेले आहेत. गावातील आरोग्य व स्वच्छतेबाबत स्थानिक प्रशासन उदासीन असून, प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकार्यांविना आहे. येथे डेंग्यूसदृश आजाराने डोके वर काढले आहे. गावात तापाचे अनेक रुग्ण आहेत. अचानक येणार ताप, चक्कर, मळमळ अशी लक्षणे या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. अभिजित ज्ञानेश्वर दाभाडे (१२), पवन दिलीप सेंगर (१७), कोमल रवींद्र तायडे (३), हरीश रामचंद्र नहाटे (११) या रुग्णांना डेंग्यूसदृश आजार झाला असून, त्यांना उपचारासाठी अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावात अस्वच्छतेने कळस गाठल्याने आजाराचा प्रसार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू आहे. येथील वैद्यकीय अधिकार्यांची दोन्ही पदे रिक्त असून प्रभारी वैद्यकीय अधिकारी आजारी रजेवर आहेत. गावात डेंग्यसदृश आजाराने थैमान घातले असताना आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकार्यांविना आहे. याबाबत प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. अकर्ते यांच्याशी संपर्क साधला असता, आपण आजारी रजेवर असून आरोग्य विभागाच्या पाच जणांचे पथक गावातील रुग्णांना भेट देत असल्याचे त्यांनी सांगितले.
दानापूरमध्ये डेंग्यूसदृश आजारांचे थैमान
By admin | Updated: September 7, 2014 23:57 IST