तेल्हारा : तेल्हारा तालुक्यात जवळपास १ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकर्यांनी महागडे बियाणे आणून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली असली तरी वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नवअंकुरीत कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. वीज वितरणचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कपाशी पिकाकडे शेतकर्यांचा कल असल्याने व तेल्हारा तालुका हा बागायती क्षेत्रात मोडत असल्याने शेतकर्यांनी १० मे पासून मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली आहे. मात्र, विजेच्या लपंडावामुळे शेतकरी फार वैतागला आहे. कपाशीचे अंकुर कोमेजलेल्या स्थितीत दिसत आहेत. शेतकरी हरीण, माकडे हाकलता हाकलता थकून गेला. त्यात वीज मंडळाच्या हलगर्जीमुळे शेतातील पिके वाया जात असल्याने शेतकरी खचला आहे. त्रस्त झालेल्या शेतकर्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याआधी वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकार्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष पुरवण्याची मागणी होत आहे.
अनियमित वीज पुरवठ्यामुळे कपाशीचे पीक धोक्यात
By admin | Updated: June 6, 2014 22:20 IST