खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी कोविड रुग्ण वेटिंगवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 10:55 AM2021-04-17T10:55:06+5:302021-04-17T10:58:30+5:30

Covid-19 in Akola : रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, ऑक्सिजनसोबतच रेमडेसिविर इंजेक्शनचीही मागणी वाढली आहे.

Covid patient waiting for oxygen, remedivir in private hospital! | खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी कोविड रुग्ण वेटिंगवर!

खासगी रुग्णालयात ऑक्सिजन, रेमडेसिविरसाठी कोविड रुग्ण वेटिंगवर!

Next
ठळक मुद्देप्रशासन म्हणते पुरेसा साठा उपलब्धरुग्णांना रेमडेसिविर मिळेना

अकोला: जिल्ह्यात कोविडच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने, ऑक्सिजनसोबतच रेमडेसिविर इंजेक्शनचीही मागणी वाढली आहे. प्रशासनाच्या मते जिल्ह्यात पुरेसा ऑक्सिजन साठा आणि रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत. मात्र, प्रत्येक्षात रुग्णांना यासाठी वेटिंगवर राहावे लागत असल्याचे वास्तव आहे. त्याचप्रमाणे, जिल्ह्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठाही मर्यादित असल्याने अनेकांना दुसऱ्या डोससाठी वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.

मागील दीड महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याने, सर्वोपचार रुग्णालयासह खासगी रुग्णालयात ऑक्सिजनची मागणी वाढली आहे, तसेच अनेकांचा सिटी स्कॅन स्कोअर ७ पेक्षा जास्त असल्याने रेमडेसिविर इंजेक्शनचाही वापर वाढला आहे. सद्यस्थितीत मागणीच्या तुलनेत उपलब्ध साठा कमी असल्याने, रुग्णांना ऑक्सिजन आणि रेमडेसिविरची प्रतीक्षा करावी लागत आहे. प्रशासनाच्या मते जिल्ह्यात ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. मात्र, प्रत्यक्ष स्थिती वेगळीच आहे. गुरुवारी शहारातील काही खासगी रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपल्याने ऑक्सिजनचे ५० ते ७० जम्बो सिलिंडर अमरावती जिल्ह्यातून मागविण्यात आले होते, तर बुधवारी २०० रुग्णांना रेमडेसिविरची मागणी असताना केवळ ४० जणांना रेमडेसिविर उपलब्ध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरसोबतच कोव्हॅक्सिनचाही साठा संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे अनेकांना कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 

ऑक्सिजन: खासगी रुग्णालयांना अनियमित पुरवठा

सर्वोपचार रुग्णालयासह जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येकी १० केएल लिक्विड ऑक्सिजन टँक कार्यान्वित झाल्याने येथील ऑक्सिजनचा प्रश्न काही प्रमाणात मिटला आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा वेळेत होत नसल्याने तुटवडा भासत आहे. खासगी रुग्णालयाला सात मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

पुढे काय, गंभीर रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास, अनेकांना ऑक्सिजनअभावी जीव गमवावा लागेल.

 

रेमडेसिविर: साठा असूनही गरजूंना रेमडेसिविर मिळेना

प्राप्त माहितीनुसार, सद्यस्थितीत शासकीय यंत्रणेकडे रेमडेसिविरचे २,२०६ व्हायल्स उपलब्ध असून, दररोज जवळपास ६२ व्हायल्सचा वापर होतो, तसेच खासगी रुग्णालयात दररोज रेमडेसिविरच्या २८२ व्हायल्सचा उपयोग केला जातो. खासगी रुग्णालयात केवळ सिटी स्कॅनच्या आधारावर रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन दिले जात असल्याने गंभीर कोविड रुग्णांना रेमडेसिविरसाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

पुढे काय, रेमडेसिविरचा वापर केवळ कोविडच्या गंभीर रुग्णांसाठीच करण्याचे निर्देश असताना, अनेक रुग्णालयात त्याचा वापर केवळ सिटी स्कॅनचा आधार घेऊन केला जातो. त्यामुळे कोविड रुग्णांना वेळेवर रेमडेसिविर मिळत नाही. परिणामी, काळ्या बाजाराला चालना मिळत आहे.

 

लसीकरण: कोव्हॅक्सिन लसीचा साठा मर्यादित

जिल्ह्यात कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असताना, मध्यंतरी लसीचा साठा संपत आल्याने लसीकरण मोहीम संकटात आली होती. मात्र, आठवडाभरापूर्वी जिल्ह्याला कोविशिल्डचे १५ हजार डोस उपलब्ध झाल्याने लसीकरण पुन्हा सुरू झाले. आता कोव्हॅक्सिनचा साठाही संपण्यावर आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थींना प्रतीक्षा करावी लागत आहे.

पुढे काय, कोव्हॅक्सिन लसीचे मागणीनुसार डोस उपलब्ध न झाल्यास अनेकांना कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे, तसेच उर्वरित लाभार्थींना केवळ कोविशिल्डचा डोस दिला जाणार असल्याने या लसीचा साठाही संपणार आहे.

 

शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून, खासगी रुग्णालयांनाही आवश्यक ऑक्सिजन पुरविण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनी रेमडेसिविरचा योग्य तिथेच उपयोग करावा. काही ठिकाणी रेमडेसिविरचा वापर केवळ सीटी स्कॅनच्या आधारावर केला जात असून, हे अयोग्य आहे. जिल्ह्यात कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून, लसीचा तुटवडा भासणार नाही.

- डॉ.राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला

Web Title: Covid patient waiting for oxygen, remedivir in private hospital!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.