निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर-निहिदा सावरखेड रस्त्याचे बांधकाम रखडले असून, पुलाचे बांधकाम निकृष्ट होत आहे. याकडे कंत्राटदार, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने संतप्त नागरिकांनी १० जानेवारी राेजी पुलाचे सुरू असलेले काम बंद पाडले. पिंजर-निहिदा रस्त्याच्या बांधकामाची मुदत संपून एक वर्ष झाल्यानंतरही काम थंड बस्त्यात आहे. पुलाचे बांधकाम शासकीय अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसून निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यापूर्वीच केल्या आहेत. ५ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या अनुराधा ठाकरे, सृष्टी ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून बांधकाम दर्जेदार करण्याची मागणी निवेदनातून केली होती. तरी सुद्धा कामात सुधारणा होत नसल्याने नागरिकांनी रविवारी हे काम बंद पाडले. जोपर्यंत कंत्राटदार येथे येऊन दर्जेदार काम करणार नाहीत. तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही, असा पवित्रा लोकांनी नागरिकांनी घेतला आहे. सदर बांधकाम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे असून, यावर देखरेख नाकट नावाच्या अधिकाऱ्याची आहे. कामाचा कंत्राट राहुल सावजी यांनी घेतल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या अनुराधा ठाकरे, सृष्टी ठाकरे, लखमापूरचे माजी सरपंच मनोज सोनटक्के, संतोष सोनटक्के, निहिदाचे विजय पाटील ठाकरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष इंगळे, नानकराम लोनाग्रे, दिनेश सोनोने, जगताप, पंडित ठाकरे, गजानन ढोरे, शैलेश घुमसे, गोपाल घुमसे, प्रवीण चव्हाण, रोशन राठोड यांच्यासह कार्यकर्ते, नागरिकांनी बांधकाम बंद पाडले.
पिंजर-निहिदा मार्गावरील पुलाचे बांधकाम नागरिकांनी पाडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST