अकोला : पावसाळा सुरू होऊन, दीड महिन्याचा कालावधी उलटून जात आहे; मात्र अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या सावटावर सोमवारी जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. गतवर्षीच्या अखर्चित ८२ लाखांच्या निधीतून जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी तीन योजना राबविण्यासही या सभेत मंजुरी देण्यात आली. यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन, दीड महिन्याचा कालावधी निघून गेला; मात्र दडी मारून बसलेला पाऊस अद्यापही बरसला नाही. पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यात खरीप पेरण्या खोळंबल्या असून, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यानुषंगाने पावसाअभावी रखडलेल्या पेरण्या, आणखी काही दिवसात पाऊस न आल्यास निर्माण होणारी टंचाई परिस्थिती, मान्सून लांबल्याच्या परिस्थितीत पीक पेरणीत करावा लागणारा बदल, त्यासाठी करावे लागणारे नियोजन इत्यादी विषयांवर कृषी समितीच्या सभेत चर्चा करण्यात आली. पाऊस लांबल्याने होणार्या पावसाप्रमाणे पेरणीचे नियोजन करण्याबाबत गावागावांत शेतकर्यांना कृषी सहाय्यकांमार्फत माहिती देण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकार्यांनी सभेत सांगितले. येत्या काही दिवसात पाऊस झाल्यास घ्यावयाची पिके आणि पेरणीसंदर्भात शेतकर्यांपर्यंंंत माहिती पोहोचविण्याच्या सूचना सभेत देण्यात आल्या. सन २0१३-१४ मधील कृषी विभागाच्या अखर्चित ८२ लाखांच्या निधीचे पुनर्विनियोजन करण्यात आले असून, या निधीतून यावर्षी शेतकर्यांसाठी तीन योजना राबविण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. या योजनांचा विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्याची शिफारस या सभेत करण्यात आली. कृषी सभापती रामदास मालवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला समितीचे सदस्य मंजुळा लंगोटे, डॉ.हिंमत घाटोळ, रमन जैन, शबाना खातून सैफुल्ला खान, देवका पातोंड, रेणुका दातकर यांच्यासह प्रभारी कृषी विकास अधिकारी बी.एन. गांधी व कृषी विभाग आणि महाबीजचे अधिकारी सभेला उपस्थित होते.
कृषी समितीच्या सभेत दुष्काळाच्या सावटावर चिंता
By admin | Updated: July 15, 2014 00:59 IST