कुरूम : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर मालवाहू ट्रकने समोरून येणाऱ्या मालवाहू जीपला जबर धडक दिल्याने मालवाहू जीपच्या चालकासह त्याची पत्नी, मुलगी आणि दोन मुले जखमी झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नवसाळ फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.कांदिवली मुंबईवरून पटना येथे एका कंपनीची नवीन जीप डिलिव्हरी देण्यासाठी मुंबई येथील मनोहर गुप्ता (४२) हे त्यांची पत्नी, दोन मुले व एक मुलगी यांच्यासोबत जात असताना नवसाळ गावानजीक शेरे बिहार या ढाब्यासमोर सकाळी ९ वाजताच्या सुमारास नागपूरवरून अकोल्याकडे जाणारा एमएच-४० बीएल-८२८७ क्रमांकाच्या मालवाहू ट्रक चालकाने दारूच्या नशेत ट्रक भरधाव व निष्काळजीने चालवून जीप गाडीला जबर धडक दिली. यात जीप चालक मनोहर गुप्ता यांच्यासह त्यांची पत्नी, १२ वर्षांची मुलगी हे तिघे गंभीर जखमी झाले तर दोन मुलांना किरकोळ दुखापत झाली. अपघातात जीप गाडीची कॅबिन क्षतिग्रस्त झाल्याने गंभीर जखमी त्यात अडकले होते. यावेळी पोलिसांनी व नवसाळ, कुरूम येथील गावकऱ्यांनी जखमींना बाहेर काढले आणि १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेद्वारा तातडीने अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. यात जीप चालक मनोहर गुप्ता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मनोहर गुप्ता हे वाहन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित. गुप्ता हे उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यातील ओडी ग्रामचे राहणारे आहेत. अपघातानंतर ट्रकचा चालक घटनास्थाळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच, माना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जयसिंग पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, नीलेश इंगळे यांनी जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करून महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.
ट्रकची मालवाहू वाहनास धडक; चालकाचा मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:10 IST