सचिन राऊत / अकोला : प्रॉपर्टी ब्रोकर किशोर खत्री यांची हत्या ज्या निर्माणाधीन शॉपिंग मॉलच्या आर्थिक व्यवहारांमधील वादातून झाली, तो मॉल ज्या चित्रा चित्रपटगृहाच्या जागेवर उभा राहिला आहे, त्या जागेचा इतिहासच रक्तरंजित आहे. बालाजी ट्रस्टच्या मालकीच्या ज्या जागेवर आता शॉपिंग मॉल उभा झाला आहे, त्या जागेवर पूर्वी चित्रा टॉकीज व त्यामागे २0 खोल्या होत्या. गत ३0 ते ३५ वर्षांच्या कालावधीत या जागेसाठी तीन जणांची हत्या झाली, दोन जणांवर प्राणघातक हल्ले झाले आणि इतर अनेकांसंदर्भात मारहाण व धमकीच्या घटना घडल्या. किशोर खत्री यांच्या हत्याकांडाने या जागेच्या रक्तरंजित इतिहासाला पुन्हा उजाळा मिळाला असून, ही जागा आणखी किती जणांचा बळी घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या जागेचा ताबा १९७६ पासून बालाजी ट्रस्टचे सूर्यकांत कोलपेकर यांच्याकडे होता. या जागेच्या ताब्यासाठीच २३ जानेवारी १९८३ रोजी कोलपेकर यांच्यावर बॉम्ब फेकून त्यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर नटवरलाल शहा यांच्यावर याच जागेसाठी प्राणघातक हल्ला झाला होता. शहा यांचे दोन्ही पाय तोडल्याने त्यांचा काही दिवसातच मृत्यू झाला होता. शहा यांच्या मृत्यूनंतर, चित्रा टॉकीजच्या पाठीमागील बाजूस असलेल्या २0 खोल्यांमधील भाडेकरूंना मारहाण करणे, त्यांना बंदुकीचा धाक दाखविणे, असे प्रकार सुरू झाले होते. दहशतीमुळे त्या २0 भाडेकरूंनी खोल्या खाली केल्या होत्या. टॉकीजच्या पाठीमागील जागा व खोल्या खाली झाल्यानंतर काही वर्षांनी, १८ डिसेंबर १९९१ रोजी चित्रा टॉकीजमध्ये सडक या चित्रपटाचा खेळ सुरू असताना, हरिहरपेठ भागातील रहिवासी असलेल्या नारायणे नामक वीट उत्पादकाची हत्या करण्यात आली होती. दोन हत्या, दोन प्राणघातक हल्ले व अनेकांना मारहाणीच्या घटना झाल्यानंतर चित्रा टॉकीज अनेक वर्ष भग्नावस्थेत उभी होती.
चित्रा टॉकीजचा इतिहासच रक्तरंजित!
By admin | Updated: November 5, 2015 01:48 IST