लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: छत्रपती राजे संभाजी यांच्या जयंतीनिमित्त ‘छावा’ संघटनेने रविवारी सायंकाळी काढलेल्या भव्य मिरवणुकीने अकोला नगरी दुमदुमून गेली. पारंपरिक वाद्यांसह आखाड्यांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकात छत्रपती संभाजी महाराजांचा एकच जयघोष झाला. संभाजी महाराज जयंतीनिमित्त छावा संघटनेतर्फे रविवारी दुपारी पाच वाजता शिवाजी पार्क येथून संभाजी महाराज जयंती मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी शिवाजी पार्क येथे महापौर विजय अग्रवाल, छावा जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, डॉ. दीपक मोरे, डॉ. रणजित कोरडे, जि. प. सदस्य चंद्रशेखर पांडे, सुरेश खुमकर, प्रदीप खांडे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.महापौर विजय अग्रवाल यांच्या हस्ते छावाचा भगवा फडकवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. संजय सरोदे, डॉ. राम शिंदे, डॉ. रणजित कोरडे, डॉ. अमोल रावणकर, अरविंद कपले, मणीराम ताले यांची उपस्थिती होती. शिवाजी पार्क येथून संभाजी महाराजांच्या जयघोषात सुरू झालेल्या मिरवणुकीच्या सुरुवातीलाच पारंपरिक वाद्यांच्या गजरात त्रिशूलधारी व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत छत्रपती राजे संभाजी यांच्या रथासोबतच विविध देखावे सादर करण्यात आले होते. शिवाजी महाविद्यालय परिसरातून ही मिरवणूक अकोट स्टॅन्ड चौकात पोहोचली. येथून मानेक टॉकीज, जुना कापड बाजार, कोतवाली मार्गे गांधी चौकात पोहोचली. दरम्यान, चौकाचौकात मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. येथून ही मिरवणूक खुले नाट्यगृहातून धिंग्रा चौकात पोहोचली आणि स्वराज्य भवन येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणुकीत खडकी येथील शिवप्रतिष्ठान आखाडा, तेल्हारा येथील बजरंग चौक आखाडा यांच्यासह जिल्हाभरातील विविध आखाड्यांचा सहभाग होता. आखाड्यांसोबतच वारकरी संप्रदायानेही मिरवणुकीला वेगळा उत्साह दिला. जिल्ह्यातीलच नव्हे, तर बुलडाणा तालुक्यातील पातुर्डा खु. येथील जगदंबा टाळकरी मंडळाचाही समावेश होता.पालकमंत्र्यांच्या हस्ते संभाजी राजांच्या प्रतिमेचे पूजनसायंकाळच्या मिरवणूकीपूर्वी सकाळी जवाहर नगर चौकात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते संभाजी राजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेवक आशीष पवित्रकार, नगरसेविका सुनीता अग्रवाल, डॉ. दीपक मोरे, जिल्हाध्यक्ष शंकरराव वाकोडे, भाजप शहर अध्यक्ष किशोर मांगटे पाटील, प्रदीप खाडे, डॉ.अमोल रावनकर आदी उपस्थित होते.वाघ्या, बालसंभाजीने वेधले लक्षदरवर्षी मिरवणुकीत वाघ्या हा सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पातूर येथील सुरेश सिंह यांनी वाघ्याची वेशभूषा धारण केली होती. सूरज नाथे या बालकाने बाल संभाजी महाराजांची वेशभूषा साकारली होती.
छत्रपती संभाजींच्या जयघोषाने दुमदुमली अकोला नगरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 02:07 IST