बाळापूर (अकोला) : फायनान्स केलेले किंवा चोरलेल्या ट्रकचे विनापरवाना सुटे भाग करून ते भंगारात विकणार्या सहा जणांना बाळापूर पोलिसांच्या विशेष पथकाने सातरगाव शिवारात अटक करून मोठय़ा टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४ लाख ४0 हजार रुपयांचा माल जप्त केला. बाळापूर शहर व परिसरात चोरीस गेलेला किंवा फायनान्स कंपन्यांकडून कर्जाऊ रकमेवर घेतलेल्या ट्रकचे गॅस कटरच्या सहाय्याने सुटे भाग करून त्यांची विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची गुप्त माहिती बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यावरून ठाणेदार घनश्याम पाटील यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने बुधवार, ३0 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातरगाव शिवारातील एका ठिकाणी छापा मारला. त्यावेळी तेथे गॅस कटरद्वारे ट्रकचे सुटे भाग करण्याचे काम सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तेथून शे. एजाज शे. उस्मान (२४, रा. छोटा मोमीनपुरा), शे. मुजीब शे. लतिफ (२६), शे. रफीक शे. लतीफ (२२), शे. अजीज शे. मजीद (३१), शे. मुतलिब शे. लतिफ (३५) सर्व रा. कासारखेड यांच्याकडून ट्रकचे चेसीस, सुटे भाग, लोखंड, लाकुड (अंदाजे किंमत ३ लाख रुपये) तसेच त्यांच्या चार मोटारसायकली ( १ लाख २0 हजार), ऑक्सिजन सिलिंडर (१0 हजार रुपये), २ गॅस सिलिंडर (५ हजार रुपये) असा एकूण ४ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बाळापूर बायपासवरील सातरगाव शिवारात १ सप्टेंबर रोजी सहा ते सात अज्ञात व्यक्तींनी सीजी 0४ जेबी १५४१ क्रमांकाचा ट्रक चालकास मारहाण करून पळवून नेला होता. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात पोलिसांनी संशयावरून ३0 सप्टेंबर रोजी उपरोक्त सहा जणांना अटक केली आहे.
ट्रकचे सुटे भाग करून भंगारात विकणा-या टोळीचा पर्दाफाश
By admin | Updated: October 2, 2014 02:13 IST