अकोला, दि. २५-जिल्ह्यातील अनेक दलित वस्तीमध्ये लावण्यात आलेले सौर पथदिवे केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. काही गावांमध्ये तर दिवे लावल्यापासूनच बंद असल्याची माहिती असून, त्याकडे जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभागाचे दुर्लक्ष आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने प्रत्येक गावात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्तीचा विकास या योजनेंतर्गत सौर पथदिवे लावण्यात आले आहेत. ते पथदिवे लावल्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित पुरवठादाराची आहे. मात्र, बंद पथदिव्याच्या तक्रारी केल्यानंतरही त्याची कुठलीच दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पथदिवे देखभालीची जबाबदारी एप्रिल २0१४ ते मार्च २0१९ पर्यंत पुरवठादार साळुंखे इंडस्ट्रिज यांची आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच ग्रामपंचायतींमध्ये असलेले सौर पथदिवे बंद पडले आहेत. त्याबाबत ग्रामपंचायतला विचारणा केली असता, योजनेची कोणतीच माहिती उपलब्ध नाही. जिल्हा परिषदेचा पंचायत विभागही अनभिज्ञ आहे. विकासाच्या नावाने टक्केवारी घेऊन देयके मंजूर करणे हाच पायंडा रुढ असल्याचा आरोपही ग्रामस्थ करीत आहेत. पळसो बढे येथील सौर पथदिव्यांची सहा महिन्यांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने तीनवेळा तक्रार केली. त्यावर माणूस पाठवतो असे सांगितल्यानंतरही माणसाचा पत्ता नाही, त्यामुळे सरकारी पैशाची अशी उधळपट्टी होत असेल, तर त्या योजनाच नको, असे मत पळसो बुद्रुक ग्रामपंचायतीचे सदस्य हितेश जामनिक व परमेश्वर पवार यांनी व्यक्त केले आहे.
दलित वस्तीतील सौरदिव्याखाली अंधार!
By admin | Updated: January 26, 2017 10:33 IST