अकोला-गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद आबालवृद्धांसहबाळ गोपालांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. शहरातील खोलेश्वर गणेश घाट, निमवाडी, हरिहर पेठ आणि हिंगणा रोड गणेश घाटांवर हजारो घरगुती गणेश मूर्तींचे जड अंतकरणाने भाविकांनी विसर्जन केले. गणेश विसर्जनाचा दुपारी बारा वाजेपर्यंतच मुहूर्त असल्याने 17 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता पासून नागरिकांची गणेश विसर्जनासाठी लगबग सुरू होती. कोणी डोक्यावर तर कोणी दुचाकीवरून तर काही भाविक ह्यात गाडीवर गणेशाची मूर्ती आणून बाप्पाला भावपूर्ण निरोप देताना दिसत होते. काही चिमुकले तर लाडक्या बाप्पाची मूर्ती हातातून सोडायला सुद्धा तयार नव्हते. सतत दहा दिवस गणपती बाप्पाची सेवा करून आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना बालगोपालांसह मोठ्या थोरांचेही अंतकरण जड होत असल्याचे दिसून आले.
बाप्पा लवकर या... अशी साद घालत अकोलेकरांकडून बाप्पाला भावपूर्ण निरोप
By नितिन गव्हाळे | Updated: September 17, 2024 16:26 IST