नवीन १५,४८२ घरकुलांना मंजुरीचे नियोजन कोलमडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 10:34 AM2020-11-29T10:34:47+5:302020-11-29T10:35:08+5:30

Akola ZP News लाभार्थी निवडीचे प्रस्ताव रखडल्याने नवीन घरकुलांना मंजुरी देण्याचे नियोजन कोलमडले आहे.

Approval planning for 15,482 new houses stalled in Akola ZP | नवीन १५,४८२ घरकुलांना मंजुरीचे नियोजन कोलमडले!

नवीन १५,४८२ घरकुलांना मंजुरीचे नियोजन कोलमडले!

Next

अकोला: प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी नवीन १६ हजार ४८२ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने लाभार्थींची निवड करून दिवाळीपूर्वी घरकुलांना मंजुरी देण्याचे नियोजन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले होते; मात्र जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या स्तरावर लाभार्थी निवडीचे प्रस्ताव रखडल्याने नवीन घरकुलांना मंजुरी देण्याचे नियोजन कोलमडले आहे.

शासनाच्या ग्रामीण गृहनिर्माण राज्य व्यवस्थापन कक्षाच्या १५ ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत सन

२०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यासाठी १५ हजार ४८२ नवीन घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी ४०७, अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींसाठी १३७ व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील लाभार्थींसाठी १४ हजार ८७५ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानुषंगाने घरकुल लाभार्थी निवडीचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी जिल्ह्यातील सातही पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना २६ ऑक्टोबर राेजी पत्राव्दारे दिले होते. तसेच दिवाळीपूर्वी लाभार्थींच्या घरकुलांना मंजुरी देण्याचे नियोेेेजनही जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले होते. परंतु दिवाळी झाल्यानंतरही घरकुल लाभार्थी निवडीचे प्रस्ताव अद्यापही जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडून जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाकडे प्राप्त झाले नाही. घरकुल लाभार्थींची निवड प्रक्रिया रखडल्याने दिवाळीपूर्वी नवीन घरकुलांना मंजुरी देण्याचे जिल्हा परिषद प्रशासनाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थींना घरकुल मंजुरीची प्रक्रिया केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

पंचायत समितीनिहाय असे आहे घरकुलांचे उद्दिष्ट!

पं.स.             घरकुले

अकोला             २,७५२

अकोट             ३,६३७

बाळापूर             २,१३५

बार्शीटाकळी १,०२०

मूर्तिजापूर             १,८८९

पातूर             १,२७८

तेल्हारा             २,७७१

Web Title: Approval planning for 15,482 new houses stalled in Akola ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.