अकोला : गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत्या १० सप्टेंबरपासून अजनी-जरप ( कोकण) या मार्गावर विशेष रेल्वेगाडी सुरू होत आहे. ही गाडी १० सप्टेंबरला जरपला जाऊन ११ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासाला निघणार आहे. या गाडीला प्रवाशांनी पसंती दर्शविल्याने पहिल्याच गाडीचे आरक्षण फुल झाले आहे.ही विशेष रेल्वेगाडी १० सप्टेंबर रोजी अजनीहून निघेल तर ती रात्री ९.३० वाजता जरप येथे पोहोचणार आहे. ११ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता ही गाडी अजनीकडे निघेल. ही रेल्वेगाडी सुरू होण्यास अद्याप पंधरवडा शिल्लक राहिला असताना, आरक्षणस्थिती हाउसफुल झाली आहे. या गाडीच्या ए.सी-थर्ड मध्ये ५ आणि ए.सी-टू मध्ये १० बर्थ उपलब्ध आहेत.मध्य रेल्वे भुसावळ मंडळ प्रबंधक कार्यालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गणेशोत्सवनिमित्त होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ही विशेष रेल्वे सोडली जात आहे. ट्रेन क्रमांक ०१२०३ (अजनी-जरप एक्स्प्रेस) सोमवारी धावेल. या दरम्यान ही गाडी वर्धा, धामणगाव, बडनेरा होत अकोल्यात रात्री ११.४१ वाजता पोहोचेल. त्यानंतर शेगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, मानगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाल होत ही गाडी जरप येथे पोहोचणार आहे. त्यानंतर ही रेल्वेगाडी ०१२०४ क्रमांकाने (जरप-अजनी एक्स्प्रेस) होऊन मंगळवार, ११ सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता परतीच्या प्रवासाला निघेल.