शहरातील ऑटोंसाठी २० थांब्यांना मंजुरी
अकोला : पश्चिम विदर्भातील सर्वांत जास्त ऑटो असणारे शहर म्हणून अकोला प्रसिद्ध आहे. मात्र गत २० वर्षांपासून शहरात एकही अधिकृत ऑटो स्टँड नसल्याने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या पाठपुराव्यानंतर आता शहरात २० ठिकाणी अधिकृत ऑटो स्टँड निर्माण होणार आहेत.
शहरात ६५०० ते ७००० ऑटो धावतात; परंतु एवढ्या मोठ्या संख्येने धावत असलेल्या ऑटोसाठी ज्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक होते, त्या दुर्दैवाने अजूनही नाहीत. अशोक वाटिका चौक ते रेल्वे स्टेशन ह्याच मार्गावर एकूण ऑटोपैकी ६० टक्के ऑटो धावतात.
नेमक्या ह्याच मार्गावर मागील दीड वर्षापासून उड्डाणपुलाची निर्मिती सुरू आहे. चांगले प्रशस्त रस्ते व सर्व सुविधायुक्त ऑटो स्टँडची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यकता आहे; परंतु नेमकी हीच सुविधा अकोल्यात नसल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महानगरपालिका अस्तित्वात येऊन आज २० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे; परंतु शहरात अजूनही एवढ्या प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटोसाठी एकही अधिकृत ऑटो स्टँड नाही. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ऑटो स्टँडचा मुद्दा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांच्यापुढे ठेवल्यानंतर त्यांनी एक समिती स्थापन करून ऑटो स्टँडसाठी संपूर्ण शहरात जागा निश्चित करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने आर. टी .ओ., महानगरपालिका, शहर वाहतूक शाखांच्या अधिकाऱ्यांनी शहरात सर्वेक्षण करून शहराचे चारीही बाजूंना प्रमुख चौकांत एकूण २० जागा निश्चित केल्यानंतर पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांच्यामार्फत नऊ महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त ह्यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्यानंतर त्यावर विचार सुरू असतानाच नव्याने रुजू झालेल्या महापालिका आयुक्त निमा अरोरा ह्यांनी गंभीरता लक्षात घेऊन दोन दिवसांपूर्वी सदर प्रस्तावाला मंजुरी दिली. लवकरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देऊन सदरच्या जागा ऑटो स्टँडसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टॉवर चौक ते पोस्ट ऑफिस चौकापर्यंतची उड्डाणपुलाखालील संपूर्ण जागा ही ऑटो स्टँडसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, उड्डाणपुलाचे बांधकाम संपल्याबरोबर आवश्यक सुविधा उपलब्ध करून तेथेसुद्धा लवकरच ऑटो स्टॅण्ड कार्यान्वित होणार आहे. एका महिन्यात शहरातील प्रचंड संख्येने धावणाऱ्या ऑटोंना एकदाची थांबण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. ह्यामुळे वाहतुकीची समस्या लवकरच सुटेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नसावी.