लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: सततची नापिकी, अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देऊन मोठी मेहनत करून शेतातून काढलेल्या पिकाला योग्य भाव नसल्याने कर्जाच्या मोठय़ा दरीत कोसळलेल्या शेतकर्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आधार तुटला असून, अशा आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या मुलांना राष्ट्रवादी काँग्रेसने दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी पुढाकार घेत शेतकर्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोरके होऊ देणार नसल्याचे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर फेडण्याची चिंता आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकर्यांच्या आत्महत्यांचे सत्र वाढतच आहे. अशा कठीण प्रसंगी सामाजिक बांधीलकी जोपासत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिले आहे. शेतकर्यांचे प्रश्न असो किंवा समाजातील उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी पक्षाचे पदाधिकारी आघाडीवर असतात. शेती व शेतकर्यांशी संबंधित प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचा १९ वा वर्धापनदिन साजरा करताना राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात पाच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुला-मुलींच्या माध्यमिक शिक्षणापर्यंत जबाबदारी स्वीकारण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्यातही अशा कुटुंबांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस उचलणार आहे. त्यासाठी पक्षाच्या जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांसह, पदाधिकारी, जिल्ह्याचे प्रभारी नेते यांच्याकडून निधी संकलित करण्यात आला आहे. गावंडे यांनी यापूर्वीही आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुला-मुलींनी दत्तक घेतले असून, आता पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानेही आणखी काही मुला-मुलींना दत्तक घेण्यात येणार असल्याचे गावंडे यांनी स्पष्ट केले आहे.
आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांना घेणार दत्तक!
By admin | Updated: June 11, 2017 02:37 IST