अकोला: यावर्षीचा पावसाळा सुरू होऊन, सव्वा महिन्याचा कालावधी उलटून गेला; मात्र अद्यापही सार्वत्रिक दमदार पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी टंचाईच्या परिस्थितीत पशुधनासाठी लागणार्या चार्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास चाराटंचाईचा प्रश्न तीव्र होण्याची शक्यता असल्याने सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा केली जात आहे. पावसाळा सुरू होऊन, सव्वा महिना उलटून गेला; परंतु पेरणीयोग्य सार्वत्रिक पाऊस झाला नसल्याने, जिल्ह्यात खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून, आणखी दिवस पाऊस न आल्यास जिल्ह्यात पाणी व चाराटंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात लहान-मोठे एकूण २ लाख ७७ हजार ८८१ पशुधन आहे, त्यामध्ये गाय, बैल, म्हैस, बकरी, मेंढय़ा व इतर जनावरांचा समावेश आहे. या पशुधनासाठी जुलै महिन्याअखेर पुरेल एवढा चारा जिल्ह्यात सध्या उपलब्ध आहे. पावसाचा पत्ता नसल्याने, हिरवा चारा उगवला नसल्याच्या परिस्थितीत गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये पशुधनासाठी लागणार्या चार्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामध्ये कडबा कुट्टी, कुटार, सरकी व ढेप आणि हिरवा चारा (झाडांचा पाला) इत्यादी चार्यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात प्रतिकिलो ५ रुपये भाव असलेल्या कडबा कुट्टीचे भाव आता प्रतिकिलो दहा रुपयांवर पोहोचले आहेत. तुरीचे कुटार प्रतिडालं ४0 ते ५0 रुपये, गव्हाचे कुटार (गव्हांडा) प्रतिडालं २५ ते ३0 रुपये आणि सोयाबीनचे कुटाराचे भाव १५ ते २0 रुपये डालं असे झाले आहेत. तसेच गेल्या महिन्यात सरकीचे भाव १७ ते १८ रुपये प्रतिकिलो होते, त्यामध्ये वाढ होऊन आता सरकीचे भाव प्रतिकिलो २0 ते २२ रुपयांवर पोहोचले आहेत. १६ ते १७ रुपये प्रतिकिलो दराने विकली जाणार्या सरकी ढेपचे भाव २0 रुपयांपर्यंंंत पोहोचले आहेत. यासोबतच बाभूळ, चिंच, सुबाभूळ व इतर झाडांचा पाला म्हणजेच हिरवा चारा पेंडयांचे भावदेखील वाढले आहेत. गेल्या महिन्यात ५ रुपयांत मिळणारी हिरव्या चार्याची लहान पेंडी १0 रुपये, आणि १0 रुपयात मिळणारी चार्याची मोठी पेंडी आता २0 रुपयांप्रमाणे विकली जात आहे. येत्या काही दिवसांत पाऊस न आल्यास चार्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
टंचाईत वाढले चार्याचे भाव
By admin | Updated: July 15, 2014 00:56 IST