अकोला: शिवणी खदान परिसरातील राहुल नगरमध्ये गुरुवारी मिरवणुकीत क्षुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ४२ आरोपींना अटक केली. या आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.राहुल नगरमधील काही युवकांनी गुरुवारी सायंकाळी या परिसरात मिरवणूक काढली. मिरवणूक एका धार्मिक स्थळाजवळून जात असताना रंग उधळल्यावरून दोन्ही गटातील युवकांमध्ये वाद सुरू झाला. वाद वाढल्यानंतर दोन्ही गटातील युवकांमध्ये हाणामारी झाली असता दोघे जण जखमी झाले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटातील युवकांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांचा शोध सुरू केला. शुक्रवारपर्यंत ४२ आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींना अटक करून त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी डी. व्ही. हरणे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हाणामारी प्रकरणातील आणखी आरोपींची धरपकड सुरू आहे.
शिवणी हाणामारीप्रकरणी ४२ आरोपी जेरबंद
By admin | Updated: April 16, 2016 02:06 IST