पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक रितेश दीक्षित यांना व अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी अर्चना भगत यांनी खतीब काॅलनीत छापा टाकून शासकीय धान्याचा अवैध साठा जप्त केला. याप्रकरणात अ. मसी अ. रशीद (३८) (रा. बडा मोमीनपुरा), मो. आसिफ मो. ताजोद्दीन (३०) (रा. सतरंजीपुरा), अ.रशीद अ.वाहेद (४०) (रा. घरकूल बाळापूर) यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून तांदळाचे १६८ कट्टे असा ८४ क्विंटल, गहू २१ क्विंटल, ज्वारी ४० किलो, मका एक क्विंटल, तूरदाळ ८० किलो, मटकी ४० किलो, हरभरा दाळ एक क्विंटल, सोयाबीन ५० किलो, असा एकूण ३ लाख ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल व ऑटो क्र. (एम.एच. ३० एए ५२५८), मालवाहू (एम. एच. ३० बीडी २२८१), इलेक्ट्रॉनिक काटे असा एकूण ८ लाख ५९ हजार २०० रुपयांचा ऐवज जप्त केला. तीन्ही आरोपींना अटक करुन गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपी मजूर असून, मुख्य आरोपीने पोलिसांना चकमा दिला. पुढील तपास बाळापूर पोलीस उपनिरीक्षक रितेश दीक्षित करीत आहेत.
बाळापुरात ३.८९ लाखांचा धान्यसाठा जप्त; तीन आरोपींना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:24 IST