वाशिम जिल्ह्यातील ३४६गावांची कोरोनावर मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 11:53 AM2021-06-09T11:53:57+5:302021-06-09T11:56:35+5:30

346 villages in Washim district beat Corona: गावकऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाचे परिश्रम या बळावर जिल्ह्यातील तब्बल ३४६ गावांनी दुस-या लाटेत कोरोनावर मात केली आहे.

346 villages in Washim district beat Corona! | वाशिम जिल्ह्यातील ३४६गावांची कोरोनावर मात!

वाशिम जिल्ह्यातील ३४६गावांची कोरोनावर मात!

Next

- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक विचारांची पेरणी, गावकऱ्यांची सतर्कता आणि प्रशासनाचे परिश्रम या बळावर जिल्ह्यातील तब्बल ३४६ गावांनी दुस-या लाटेत कोरोनावर मात केली आहे. तिसरी लाट रोखण्यासाठीदेखील आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर राहणार आहे.
जिल्ह्यात गतवर्षी ३ एप्रिल रोजी मेडशी (ता. मालेगाव) या ग्रामीण भागातच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत जिल्ह्यात जुलै व सप्टेंबर या दोन महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२१ या कालावधीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण ७,१४३ होते. यापैकी ६,८३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर १५४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुस-या लाटेत फेब्रुवारी ते मे २०२१ या कालावधीत जिल्ह्यात ३२ हजारावर रुग्ण आढळून असून यापैकी ३०,४९० जणांनी कोरोनावर मात केली तर ४२४ जणांचा उपचारादरम्या मृत्यू झाला. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दुसरी लाट ओसरत असून, जून महिन्यात तर रुग्णसंख्याही दोन अंकी येत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. दुस-या लाटेत जिल्ह्यातील ६८७ गावांत कोरोना रुग्ण आढळून आले. ग्रामपंचायत प्रशासनातर्फे प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांची सतर्कता, सकारात्मक विचार, आरोग्य, पोलीस, महसूल, जिल्हा परिषद व जिल्हा प्रशासनातील प्रत्येक घटकांचे परिश्रम या बळावर ७ जूनपर्यंत ३४६ गावांतील रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३४१ गावांत सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, तिस-या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने गावात १०० टक्के लसीकरण करणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे, कोरोनाविषयक नियमांबाबत  जनजागृती करण्यावर ग्रामपंचायतींनी भर दिल्याचे दिसून येते.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे, ही जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे. ग्रामीण भागात सक्रिय रुग्णसंख्या कमी होत आहे. कोरोनाचा धोका अजून पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे यापुढेही प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी.
- शण्मुगराजन एस.
जिल्हाधिकारी, वाशिम

Web Title: 346 villages in Washim district beat Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.